Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"जहा दर्या समंदर से मिला, वो दर्या नहीं रहता"

"जहा दर्या समंदर से मिला, वो दर्या नहीं रहता"

मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्र विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका करत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या धोरणांवर चिमटे काढत अर्थसंकल्पातील अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. तसेच भाजपसोबत जाण्यावरून त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावले आहे.

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अर्थसंकल्प मांडला जात असताना अर्थमंत्री सभागृहात उपस्थित असणे गरजेचे आहे. पूर्वी आम्ही स्वतः तासंतास चर्चेसाठी बसायचो, असे सांगत त्यांनी सरकारच्या कामकाजाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तसेच राज्यातील प्रशासनावर सरकारचे नियंत्रण नसल्याचा आरोप करत 'अधिकारी सरकारला जुमानत नाहीत, आणि मुख्यमंत्री हे का चालवून घेतात याचा तपास झाला पाहिजे,' असेही त्यांनी म्हटले.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, यावर्षीचा अर्थसंकल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीच्या दिवशी सादर करण्यात आला, ही महत्त्वाची बाब असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टोला लगावला. अर्थसंकल्पाच्या दिवशी तिथीनुसार शिवजयंती आहे, याचा माननीय मुख्यमंत्र्यांना विसर पडला होता, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

राज्याच्या कर्जाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली. सध्या राज्यावर सुमारे 11 लाख 2 हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, या कर्जावरील व्याजासाठी दरवर्षी जवळपास 70 हजार कोटी रुपये खर्च होत आहेत. म्हणजेच दररोज 192 कोटी रुपये आणि प्रति मिनिट 13 लाखांहून अधिक रुपये व्याजासाठी खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले. 'मुख्यमंत्र्यांनी दीड तास भाषण केले, त्या कालावधीत जवळपास 12 कोटी रुपये व्याज भरले गेले,' असा टोला देखील त्यांनी लगावला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला घेरले. 'सातबारा कोरा करणार' अशी घोषणा शासनाने सत्तेत येण्यासाठी केली होती. म्हणजे शेतकऱ्याला कर्जातून पूर्णपणे मुक्त करायचे अशी घोषणा होती. परंतु आता या बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफ केले. 2019 साली आमच्या महाविकास आघाडी सरकारने पहिला निर्णय शेतकऱ्यांची कर्जमाफी हा घेतला होता आणि आज 7 वर्षात पुन्हा आपण तिथेच आहोत. राज्यावरचा 4 लाख कोटींचा कर्जाचा बोजा 11 लाख कोटी झाला पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये काहीही वाढ झालेली नाही. महागाई फक्त शेतकऱ्यांसाठी नाही, बाकी सर्वांसाठी आहे. आम्हाला वाटले होते की, 5 लाखांपर्यंत तरी कर्जमाफी होईल. पण कुठले काय, घोषणा काय तर 2 लाखाची आणि ती देखील पात्र शेतकऱ्यांसाठी केली, असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांना उद्देशून हिंदीतील एक शेरही सभागृहात सादर केला. परखना मत, परखने में कोई अपना नहीं रहता, किसी भी आयने में देर तक चेहरा नहीं रहता, बडे लोगो से मिलने में, हमेशा फासला रखना, जहा दर्या समंदर से मिला, वो दर्या नहीं रहता, असे त्यांनी म्हटले.

पाटील यांनी नदी समुद्रात मिळाली की तिचे अस्तित्व संपते, या उदाहरणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा देखील साधला. नदी ज्यावेळी समुद्राला मिळते तेव्हा ती नदी राहत नाही. नदीला वाटते की, आपण एवढ्या मोठ्या समुद्रात जात आहोत. पण, वास्तवात नदी तिचे अस्तित्व संपवत असते. तुम्ही ज्या समुद्रात जात आहात, त्यातून काय हाताला लागत आहे, हे तुम्हीच ठरवा, असे त्यांनी म्हटले.

भाषणाच्या शेवटी जयंत पाटील यांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधत म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात ना 'अर्थ' आहे ना कोणता 'संकल्प' आहे. या अर्थसंकल्पातून फक्त कंत्राटदार लोकांचे भले होणार आहे आणि तेही फक्त मोठे कंत्राटदार असलेल्या लोकांचे भले होणार आहे. कोणत्याही देशाला मजबूत अर्थव्यवस्था बनवायची असेल तर मध्यमवर्ग आणि त्यांच्या खालचा वर्गात पैसे गेले पाहिजे, तर ती अर्थव्यवस्था मजबूत होते. तुमच्याकडे उलटी गंगा वाहते आहे. काम कमी आणि जाहिरात जास्त, या सरकारचा हा एकच मंत्र असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.