विधानभवनात बॉम्बची धमकी!
ई-मेलनंतर मुंबईत खळबळ; पोलिस-बॉम्ब स्क्वॉडची धावपळ
मुंबई : खरा पंचनामा
विधानभवनात बॉम्ब लावल्याची धमकी मिळाल्यानंतर राजधानीतील विधान भवन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. एका ई-मेलद्वारे आलेल्या या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाने तातडीने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेतली आहे.
धमकीच्या ई-मेलनंतर विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. सर्व कर्मचारी आणि भवनात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना गेटवर lरोखण्यात आले. फक्त अधिकृत कर्मचाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र तपासून एक-एक करून आत सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे विधानभवनाचे आयडी कार्ड आहे, त्यांना कसून तपासणीनंतर प्रवेश दिला जात आहे. यामुळे भवनाच्या आवारात मोठा गोंधळ निर्माण झाला असून, कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी धमकीच्या ई-मेलची सखोल चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर बॉम्ब शोधक पथक विधानभवनाच्या आत दाखल झाले असून, प्रत्येक कोपरा तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे. भवनाचा परिसर अतिशय विस्तीर्ण असल्याने शोधकार्य मोठ्या प्रमाणात राबवले जाणार आहे. यासाठी डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली असून, डॉगच्या सहाय्याने संशयास्पद वस्तू शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांचा अंदाज आहे की, संपूर्ण शोधमोहीम पूर्ण होण्यास काही तास लागू शकतील.
सद्यस्थितीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसली तरी सुरक्षा यंत्रणा सर्वोच्च सतर्कतेवर आहे. या घटनेमुळे विधानभवनातील सर्व कामकाज तात्पुरते स्थगित करण्यात आले असून, कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे सांगितले आहे.
या धमकीमुळे मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सर्व संबंधित विभाग एकत्रितपणे काम करत असल्याने लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांना या परिसरात गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.