"नाव टाकणं म्हणजे एक प्रतिष्ठा असते..."
मुंबई : खरा पंचनामा
भोंदू अशोक खरात याच्या कारनाम्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. अशातच भोंदू खरातच्या संपर्कात मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. आता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांची नावं भोंदू खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत असल्याने विरोधकांनी चांगलंच रान उठवले आहे.
चंद्रकांतदादांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी अजब उत्तर दिले आहे. लग्नपत्रिकेत मोठी नावं टाकण्याची ग्रामीण भागातील पद्धत आहे. येणार की, नाही येणार, विचारलं की नाही विचारले, यापेक्षा नाव टाकणं म्हणजे एक प्रतिष्ठा असते. पण खरातच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत माझं नाव होतं, हे मला आत्ताच तुमच्याकडून कळतंय, असे पाटील म्हणाले आहेत.
उध्दव ठाकरे निवडणुकीच्या तयारीला लागले असतील तर मी त्यांचं अभिनंदन करेन. जिल्हा पंचायत समिती निवडणुकीत त्यांची एकही सभा झाली नाही. प्रयत्न केले तर यश मिळेल, असा उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला असेल. राज्यात विरोधी पक्ष सुद्धा सक्षम पाहिजे. विरोधी पक्ष मजबूत होण्यासाठी त्यांनी गावोगाव फिरावं. शरद पवार आजारातून बाहेर पडताच पुन्हा फिल्डवर आलेत, असा टोला मंत्री पाटील यांनी ठाकरेंना लगावला.
इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याच्या प्रकरणावर बोलताना पाटील म्हणाले, पेट्रोल डिझेल बाबत भीती निर्माण करून देण्याचा प्रयत्न चालला आहे. काही भीती व्यापाऱ्यांकडून, काही भीती विरोधकांकडून आणि काही भीती माणसाच्या असुरक्षितेतून निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री सुद्धा कुठेही पेट्रोल डिझेल किंवा घरगुती गॅसचा तुटवडा नाही हे सांगत आहेत. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सुरवातीला जशा रांगा लागल्या तशा आता लागत नाहीत. हे युद्ध लवकर संपावं, यासाठी जगातील सगळे नेते प्रयत्न करत आहेत, असे मंत्री पाटील म्हणाले.
मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाच्य पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावर पाटील यांनी फारसे बोलणे टाळले. मला जितकं काम दिले जाते तेवढेच मी करतोय. कंबोज कोण? राहतात कुठे, मुलाची पार्टी की मुलीची पार्टी, पार्टीत कोण आले, आपल्याला काय करायचंय?, असे म्हणत पाटील यांनी त्यावर पडदा टाकला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.