पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!
जम्मू : खरा पंचनामा
नियंत्रण रेषेवरील सतत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर काश्मीरच्या उरी भागात भारतीय लष्कर व जम्मू-काश्मीर पोलिसांनी एकत्रित मोहीम राबवून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला जाग्यावरच ठार मारले. ही घटना १४ व १५ मार्चच्या मध्यरात्री घडली. दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा दलांनी त्याला रोखले.
लष्कराच्या अधिकृत माहितीनुसार, उरी सेक्टरमधील बुछार भागात संशयास्पद घुसखोरी होण्याची विश्वसनीय खबर जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून लष्कर व पोलिसांच्या संयुक्त पथकाने शनिवार-रविवार मध्यरात्री सखोल शोध मोहीम सुरू केली. परिसर पूर्णपणे वेढला गेला आणि संभाव्य मार्गावर अंबुश बसवण्यात आले.
घनदाट जंगल आणि काळोखाचा फायदा घेऊन दहशतवादी पुढे सरकत असल्याचे सैनिकांच्या नजरेत आले. सैनिकांनी तातडीने आपली जागा बदलली आणि त्याला आत्मसमर्पण करण्याचे आव्हान दिले. मात्र, कोपऱ्यात अडकलेल्या दहशतवाद्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी त्वरित प्रत्युत्तर दिले आणि अवघ्या काही मिनिटांच्या चकमकीत त्याला ठार मारले.
मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. यात एके रायफल, अनेक पिस्तुले, भरपूर जिवंत काडतुसे आणि दारूगोळा यांचा समावेश होता. एवढ्या मोठ्या शस्त्रसाठ्यासह तो आल्याने तो मोठ्या हल्ल्याची तयारी करून सीमेपलीकडून पाठवला गेल्याचे स्पष्ट संकेत मिळतात.
सुरक्षा दलांना अजूनही त्या भागात अधिक दहशतवादी लपले असण्याची शक्यता वाटत असल्याने शोध मोहीम अद्याप सुरूच आहे. बुछार व आसपासच्या जंगलांमध्ये ड्रोन आणि स्निफर डॉग्सचा वापर करून तपासणी चालू आहे. बर्फ वितळल्यानंतर घुसखोरीचे प्रयत्न वाढू शकतात म्हणून सीमेवर दक्षता आणखी कडक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीमेवर सर्वतोपरी सज्जता ठेवली जाईल आणि कोणत्याही घुसखोरीला तातडीने रोखले जाईल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.