आता भटकी कुत्री शिक्षकांनी मोजायची?
सरकारचा अजब फतवा
बेळगाव : खरा पंचनामा
मुलांना दूध-अंडी देण्याची नोंद ठेवा, मतदार यादी पुनरावलोकनासाठी बीएलओची जबाबदारी घ्या, यासह इतर सरकारी कामांची जबाबदारी शिक्षकांवर आहे. आता लवकरच कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारतर्फे हाती घेतल्या जाणाऱ्या योजनेसाठी सरकारी आणि अनुदानित शाळेतील प्रत्येकी एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे.
राज्यात भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या तयारीत असलेल्या सरकारने आता शाळा परिसरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकांनाच नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची प्रक्रिया प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येक शाळेत एका शिक्षकाला नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र शिक्षकांवर विविध सरकारी कामांचा बोजा असल्यामुळे नवीन जबाबदारी शिक्षकांवर देऊ नये अशी मागणी वाढत असतानाच कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हाती घेतल्या जाणाऱ्या योजनांची जबाबदारी शिक्षकांना देण्याच्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली असून राज्यभरात आधीच शिक्षकांची कमतरता आहे. केंद्र सरकार लवकरच जनगणना सुरू करणार असून त्यातही शिक्षकांना सहभागी व्हावे लागणार आहे.
तसेच एसआयआर सुरू करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचारी कमतरतेच्या परिस्थितीत सरकारच्या अनेक कार्यक्रमांसाठी शिक्षकांची नियुक्ती करावी लागत असल्याने शालेय शिक्षण खात्यावर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांसाठीही शिक्षकांना नोडल अधिकारी बनवण्याचा निर्णय हास्यास्पद असल्याचे मत शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.