Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'सहा कोटी मराठे तुमच्या पाठीशी'धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानात मनोज जरागेंचा एल्गार

'सहा कोटी मराठे तुमच्या पाठीशी'
धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानात मनोज जरागेंचा एल्गार

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबईतील आझाद मैदान येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. आंदोलनकर्ते दीपक बोऱ्हाडे यांचे मागील नऊ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असून, या आंदोलनाला मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला.

या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी धनगर समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले. "आरक्षण हवे असेल तर घरात बसून चालणार नाही. सर्वांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हा, फूट पडू देऊ नका," असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.

तसेच, "मी पूर्ण ताकदीने दीपक बोऱ्हाडे यांच्या पाठीशी उभा आहे. धनगर समाजाने एकजूट दाखवली तरच न्याय मिळेल," असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.

जरांगे पुढे म्हणाले की, "धनगर समाज कडवट झाला तर आरक्षण मिळू शकते. सहा कोटी मराठा बांधव तुमच्या पाठीशी उभे करतो, हा माझा शब्द आहे." त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी रिक्षा, टेम्पोने मोठ्या संख्येने मुंबईत येण्याचे आवाहनही केले.

या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असताना, जरांगे पाटील यांच्या सहभागामुळे या प्रश्नाला आणखी राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या आंदोलनाची दिशा काय राहते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.