Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरे 'साहेब' असा उल्लेख

एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरे 'साहेब' असा उल्लेख

मुंबई : खरा पंचनामा 

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या एकूण 9 सदस्यांचा कार्यकाळ येत्या 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. निरोप देण्यात येणाऱ्या आमदारांमध्ये भाजपचे चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, तर काँग्रेसचा एक सदस्य निवृत्त होणार आहे.

या नऊ आमदारांची निवड 14 मे 2020 रोजी करण्यात आली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (24 मार्च) या सर्व आमदारांचा निरोपाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे साहेब असा उल्लेख केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, नऊ सदस्य निवृत्त होत आहेत. विधान परिषदेमध्ये अनेक विषयांवर साधक बदक चर्चा होतात. कधी कधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप देखील होतात. पण आज आपण सगळे एका हळव्या वळणावर उभे आहोत. आज सभागृहातले नऊ सदस्य निवृत्त होत आहेत.

कितीही टाळलं तरी हे निरोपाचं वळण काय आपल्याला टाळता येत नाही आणि निरोप देणाऱ्यांची आणि निरोप घेणाऱ्यांची इच्छा नसली तरी थांबा आला असल्याने थांबावेच लागतं. मग तो प्रवास असो किंवा विधिमंडळाचा सहवास असो, ज्याचा थांबा आला त्याला थांबावेच लागतं. सध्या चैत्र नवरात्रोत्सव आहे. या नवरात्रोत्सवात वरिष्ठ सभागृहातील नऊ सदस्यांना आज आपण निरोप देत आहोत. त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आहेत, डॉ. नीलमताई गोरे, अमोल मिटकरी, शशिकांतराव शिंदे, रणजीत सिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केनेकर आहेत. हे आपले नऊ सहकारी कार्यकाळ पूर्ण झाल्याने आज निवृत्त होत आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्याच आठवड्यामध्ये राज्यसभेतील काही सदस्यांच्या निरोप समारंभात या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाषणात सांगितलं होतं की, राजकारणात पूर्णविराम कधीच नसतो. सदस्य राज्यसभेतून निवृत्त झाले तरी त्यांचे जनजीवन संसदेच्या कक्षेबाहेरे निरंतर सुरू असतं. त्याच धरतीवर आज विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांच कार्य यापुढेही निरंतर सुरू राहील, याची मला खात्री आहे. यापैकी काही सदस्य पुन्हा सभागृहात येतील. त्यासाठी देखील मी शुभेच्छा देतो. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो. तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.