वाहतूक पोलिसांकडूनच पैशांची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल
भाईंदर : खरा पंचनामा
मिरा रोड येथे वाहतूक पोलिसांकडूनच मासिक हप्त्याची मागणी केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षकावर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिरा-भाईंदर शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून काशिमीरा वाहतूक शाखेची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांमध्ये शंभरहून अधिक वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात असून त्यामध्ये महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हे कर्मचारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतात. यामुळे शासनाच्या महसुलातही भर पडते. मात्र, अनेक वेळा दंड टाळण्यासाठी काही वाहनचालकांकडून रोख रक्कम घेऊन सोडण्यात येत असल्याच्या तक्रारी अधूनमधून समोर येत असतात.
दरम्यान, मिरा रोड येथे एका महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडून दरमहा ठराविक रक्कम देण्याची मागणी काशिमीरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले आणि त्यांच्या सहायक निरीक्षकाकडून करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या संदर्भात पैशांची मागणी करतानाचे पुरावे जमा करून संबंधित महिलेने एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत सहायक पोलीस आयुक्त दयानंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. चौकशीदरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंगोले यांनी पैशांची मागणी केल्याचे प्राथमिक निष्पन्न झाले. त्यानंतर सावंत यांनी अहवाल तयार करून काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.