सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या निधीत मोठी घट
फक्त ३ जिल्ह्यांनाच १००० कोटी मंजूर
मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात जिल्हा वार्षिक योजनेसाठी २१ हजार ८६७ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली असून, यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्याला निधी वाढीच्या बाबतीत झुकते माप मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्ह्याला एकूण आकड्यात सर्वाधिक निधी मिळाला असला, तरी गेल्या तीन वर्षांतील वाढीचा कल पाहता नागपूरने आघाडी घेतली आहे.
पुढील आर्थिक वर्षासाठी राज्याच्या नियोजन विभागाने गेल्या वर्षाच्या तुलनेत १,७०२ कोटींची वाढ केली आहे. पुणे, नागपूर आणि मुंबई उपनगर या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी १,००० कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यासाठी १३०० कोटींची तरतूद असूनही, गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ केवळ ६६ कोटींची आहे. याउलट, नागपूरसाठी १०२१.९० कोटींची तरतूद करण्यात आली असून, ही वाढ तब्बल १३७ कोटींची असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे.
२०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षांच्या कालखंडाचा विचार केल्यास राजकीय प्राधान्य स्पष्टपणे दिसून येते. या काळात नागपूर जिल्ह्याच्या निधीत एकूण ३३८ कोटींची भर पडली आहे, तर पुणे जिल्ह्याच्या निधीत २३१ कोटींची वाढ झाली आहे.
विशिष्ट जिल्ह्यांना अधिक निधी मिळण्यावरून चर्चा सुरू असली, तरी नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ आणि आदिवासी भाग यांसारख्या तांत्रिक निकषांच्या आधारावरच हे सूत्र निश्चित केले जाते, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तरीही, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याला मिळालेली भरीव वाढ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
जिल्हा : नवीन तरतूद (कोटी) : चालू आर्थिक वर्षातील निधी
मुंबई शहर ५५५ : ५२८
मुंबई उपनगर ११०५ : १०६६
ठाणे ८६० : ८१५
रायगड 517 : ४८१
रत्नागिरी ४३९ : ४०६
सिंधुदुर्ग ३०७ : २८२
पुणे १३०० : १२३४
सातारा ५८२ : ५४०
सांगली : 457 : ४३६
सोलापूर ६९८ : ६४०
कोल्हापूर ५५० : ५२३
नाशिक ८१७ : ७२४
धुळे 290 : २७१
जळगाव ६२७ : ५७८
अहिल्यानगर ७६१ : ७२४
नंदुरबार १८८ : १७६
छत्रपती संभाजीनगर ६८३ : ६०२
जालना ३९८ : ३७६
परभणी ३३२ : २९८
नांदेड ५१४ : ४९१
बीड 536 : ४८३
लातूर ४०५ : ३८६
धाराशिव ४०५ : ३७८
हिंगोली २६७ : २४६
नागपूर 1021 : ८८४
वर्धा : ३४३ : २९३
भंडारा २५० : २३३
चंद्रपूर ४३० : ३९०
गडचिरोली ३९० : ३४१
गोंदिया २६० : २४५
अमरावती ६०५ : ५२७
अकोला २६३ : २२५
यवतमाळ ४५२ : ४११
बुलढाणा ४१४ : ३७८
वाशिम २८३ : २६०
पालघर ३२२ : २९६
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.