गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध
पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
मुंबई : खरा पंचनामा
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम आणि अफवा राज्यात पसरल्या आहेत. राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नसून, नागरिकांनी इंधन किंवा गॅस तुटवड्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या वतीने आपण जनतेला असं आवाहन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9,000 मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून ते 11,000 मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे, घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याबाबत नागरिकांनी निश्चिंत राहावे, अशी माहितीही छगन भुजबळ यांनी फेसबुक पोस्टवरुन दिलीय.
गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. रुग्णालये, शाळा, आश्रमशाळा आणि अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्याने मिळेल, याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा तक्रारींसाठी तालुका व जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष आणि व्हॉट्सअॅप सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुरवठा विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
सरकारकडून गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. बुकिंग करूनही गॅस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना गॅस एजन्सीसमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पहाटेपासूनच गॅस एजन्सी कार्यालयांबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आता, या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गॅस पुरवठ्याबाबत सविस्तर भाष्य केलंय. LPG गॅसची कोणतीही कमतरता नाही, काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती तयार करतोय, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.