Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"Welcome To Hell! दोन पायांवर आलात, पण चार खांद्यांवरच परत जाल"

"Welcome To Hell! दोन पायांवर आलात, पण चार खांद्यांवरच परत जाल"

तेहरान : वृत्तसंस्था 

अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारुन जवळपास महिना झाला आहे. या एक महिन्यात इराणने दोन्ही देशांच्या नाकी नऊ आणलं आहे. इराणच्या कडव्या प्रतिकारामुळे युद्ध लांबलं असून जगात चिंतेचे वातावरण आहे.

तर, दुसरीकडे या युद्धात निर्णायक टप्पा गाठण्यासाठी अमेरिका इराणविरोधात आता जमिनी कारवाई करणार असल्याचे वृत्त आहे. अशातच इराणने अमेरिकेला धडकी भरवणारी धमकी दिली आहे. तुम्ही इराणमध्ये दोन पायांवर याल, पण जाताना चार खांद्यांवर जाणार असल्याचं इराणने म्हटले आहे.

पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. इराणचे सरकारी मुखपत्र मानल्या जाणाऱ्या 'तेहरान टाइम्स'ने आपल्या पहिल्या पानावर 'वेलकम टू हेल' (Welcome To Hell) अशा मथळ्याखाली अमेरिकेला उघड आव्हान दिले आहे. "जर अमेरिकन सैनिकांने इराणच्या जमिनीवर पाऊल ठेवले, तर ते जिवंत परतणार नाहीत, तर केवळ शवपेट्यांमध्येच (Coffins) परत जातील," अशा कडक शब्दांत इराणने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

वॉशिंग्टनमध्ये सध्या इराणमधील अणू प्रकल्पांना लक्ष्य करण्यासाठी 'लिमिटेड ग्राउंड ऑपरेशन'वर चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील विशेष मोहिमेसाठी मर्यादित सैन्य तैनात करण्यात रस दाखवल्याचे समजते. इराणचा उच्च संवर्धित युरेनियमचा साठा जमिनीखालील खोल सुरक्षित ठिकाणावर असल्याने, तो नष्ट करण्यासाठी केवळ हवाई हल्ले पुरेसे नसून जमिनीवरून सैन्य कारवाई करणे आवश्यक असल्याचे अमेरिकन लष्करी तज्ज्ञांचे मत आहे.

'तेहरान टाइम्स'च्या पहिल्या पानावर शस्त्रसज्ज सैनिक विमानाकडे कूच करत असल्याचे चित्र छापून इराणने आपण या आव्हानांना तयार असल्याचे म्हटले. इराणने म्हटले आहे की, अमेरिकेची ही कारवाई त्यांच्यासाठी एखाद्या 'दलदली'सारखी ठरेल, ज्यात अमेरिकन सैन्य पूर्णपणे रुतून बसेल. या युद्धामुळे केवळ लष्करीच नव्हे, तर जागतिक भू-राजकीय आणि आर्थिक संकट ओढवेल, असा इशाराही देण्यात आला आहे. १९७९ च्या क्रांतीचा आवाज मानल्या जाणाऱ्या या वर्तमानपत्रातील इशारा म्हणजे थेट इराणी राजवटीचाच अधिकृत संदेश मानला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.