Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नराधम अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

नराधम अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक : खरा पंचनामा 

संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील तपासात नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने आज या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातचा तपास करण्यासाठी एसआयटीला (SIT) अधिक कालावधीची गरज असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.

आज सकाळी 11:30 वाजता अशोक खरातला कडक पोलीस बंदोबस्तात न्यायमूर्ती श्रीमती एम. व्ही. भराडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एसआयटीचे तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. सरकारी पक्षाने युक्तिवाद करताना सांगितले की, "आरोपी हा तपासात सहकार्य करत नाहीये. त्याने मोबाईलमध्ये अनेक नावे 'डमी' किंवा 'कोडवर्ड' मध्ये सेव्ह केली असण्याची शक्यता आहे, ज्यात काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असू शकतो. तसेच, पीडित महिलांना तो जे 'द्रव्य' किंवा पाणी पाजत होता, त्याबाबतही सखोल तपास करायचा आहे."

दुसरीकडे, आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध केला. "मोबाईल जप्त केला आहे, क्लोन कॉपी मिळाली आहे, मग पुन्हा कोठडीची गरज काय? रिव्हॉल्व्हरचा परवानाही आरोपीकडे होता," असा दावा त्यांनी केला. मात्र, पीडित महिलेचे वकील एम. वाय. काळे यांनी याला आक्षेप घेत सांगितले की, आरोपीच्या कृत्यामुळे पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून समाजाला न्याय मिळण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे.

अशोक खरातवर आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल झाले आहेत. यातील 8 गुन्हे महिलांवर केलेल्या अत्याचारासंदर्भात असून 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. एसआयटीने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला आता तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करणे आणि त्याच्या जंगम मालमत्तेचा शोध घेणे अद्याप बाकी आहे. फॉरेन्सिक टीमकडून डेटा रिकव्हरीचे काम सुरू असून त्यातील माहितीच्या आधारे खरातची समोरासमोर चौकशी करणे गरजेचे आहे.

या हायप्रोफाईल प्रकरणामुळे आज नाशिक जिल्हा न्यायालय परिसरात पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एसआयटीचे पथक तपासाच्या फाईल्स घेऊन कोर्टात दाखल झाले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तपासाची व्याप्ती आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपासादरम्यान खरात आणखी कोणाची नावे घेतो आणि त्याच्या 'कोडवर्ड'चे रहस्य काय आहे, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.