सांगली जिल्ह्यात 24 तासात तीन खून
कवलापूर, कुपवाड, बामणोलीत पडले मुडदे
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यात 36 तासात तीन मुडदे पडले. एकाच दिवसात तीन खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस प्रशासन मात्र घटनेनंतर तातडीने संशयितांना अटक केल्याचा टेंभा मिरवत स्वतःचीच पाठ थोपटून घेत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.
कवलापूर येथे यात्रेत मध्यरात्री एकमेकांना धक्का लागून शिवीगाळ करण्यात आल्याच्या कारणावरुन एका युवकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. विश्वास कल्लाप्पा सुतार (वय ३४, रा. कवलापूर, ता. मिरज ) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी पकडून ठेवलेला संशयित रोहित उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक (वय २४, रा. कवलापूर, मूळ रा. मराठी प्रशालेनजीक, भोसे, ता. मिरज) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन वाघ मारल्याचा आव आणल्याचे कवलापूर येथील ग्रामस्थ बोलत आहेत.
सोमवारी दुपारी बामनोली गावातील देशी दारूच्या दुकानात सचिन माने याच्यावर धारदार हत्याराने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. मागील काही दिवसांपूर्वी सचिन मानेच्या मित्रासोबत शुभम वाघमोडे याची वादावादी झाली होती. सचिन माने याचा मित्र व शुभम वाघमोडे या दोघांच्या वादावादीत सचिन माने हा सहभागी झाला होता. त्याच्या रागातून शुभम वाघमोडे व सुनील दुधाळ या दोघांनी मिळून सचिन माने याला धारदार हत्यारांनी वार करून ठार केले. वाघमोडे आणि दुधाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कुपवाड शहरातील कापसे प्लॉट येथे सोमवारी सकाळी दगडू केंगार याचा मृतदेह त्याच्याच घरात संशयास्पदरित्या सापडला. पंचनामा केल्यानंतर त्याचाही खून झाल्याचे स्पष्ट झाले.
एकंदरीत 24 तासात तीन खुनाच्या घटना घडल्याने सांगलीकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.