जिल्हाधिकाऱ्यांनी 3 लिपिकांना पदावनत करून शिपाई बनवले
कानपुर : खरा पंचनामा
सरकारी नोकरी म्हणजे सर्वात सुरक्षित नोकरी असे मानले जाते. एकदा नोकरी मिळाली की सहजासहजी आपल्याला कुणी कामावरुन काढू शकत नाही, किंवा कुणी आपल्याला पदावरुन हटवू शकत नाही असा सरकारी कर्मचाऱ्यांचा भ्रम असतो.
कर्मचाऱ्यांचा भ्रम तोडणारा धडाकेबाज निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. ज्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तीन लिपिकांना पदावरुन खाली उतरवत शिपाई बनवले आहे. कानपूर जिल्हाधिकारी कार्यालयात हा प्रकार घडला आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांच्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कानपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या तीन कनिष्ठ लिपिकांना शिपाई पदावर पदावनत केले आहे. टायपिंग चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते. तिघेही मिनिटाला 25 शब्दसुद्धा टंकलेखन करू शकले नाहीत, असे वृत्त आहे. या तिघांचीही 2023 मध्ये 'मृत व्यक्तींच्या आश्रित' कोट्यातून कनिष्ठ लिपिक पदांवर नियुक्ती करण्यात आली होती. भरतीच्या नियमांनुसार, त्यांना एका वर्षाच्या आत मिनिटाला 25 शब्दांच्या स्पीडने टायपिंग चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक होते.
डीएमच्या कॅम्प ऑफिसमध्ये कार्यरत असलेले प्रेमनाथ यादव, अमित कुमार यादव आणि जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेली नेहा श्रीवास्तव यांनी 2024 मध्ये त्यांची पहिली टायपिंग चाचणी दिली. तिघेही त्यात नापास झाले. यानंतर, त्यांची वार्षिक वेतनवाढ थांबवण्यात आली. त्यांना 2025 मध्ये दुसरी संधी देण्यात आली, पण यावेळीही ते अयशस्वी ठरले. आता डीएमने तिघांची पदावनती करून त्यांना शिपाई पदावर नियुक्त करण्याचा आदेश जारी केला आहे.
अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (शहर) डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले की, पहिल्या अपयशानंतर त्यांची पगारवाढ रोखण्यात आली, परंतु दुसऱ्यांदा अपयशी ठरल्यावर त्यांना वर्ग 4 पदावर पदावनत करण्यात आले. कानपूरमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे मानले जात आहे. प्रशासनाचा स्पष्ट संदेश आहे की, सरकारी नोकऱ्यांसाठी टायपिंगसारखी मूलभूत कौशल्ये आवश्यक आहेत. केवळ नोकरी मिळणे पुरेसे नाही तर कामगिरी आणि किमान पात्रता देखील टिकवून ठेवली पाहिजे. सरकारी कामात कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी अशी पावले उचलली जातील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.