गोपीचंद पडळकरांचा हिंदू जनआक्रोश मोर्चा रोखला
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील सासवड ते कोंढवा हिंदू जनआक्रोश मोर्चा पोलिसांनी रोखला आहे. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.
या हिंदू जनआक्रोश मोर्चात बाईक रॅली काढण्यात आली होती. ही बाईक रॅली पुण्यातील खडी मशीन चौकापर्यंत जाणार होती. त्याठिकाणी गोपीचंद पडळकर यांची छोटेखानी सभा होणार होती. मात्र, त्याठिकाणी जाण्यापूर्वीच पोलिसांनी ही बाईक रॅली रोखली आहे. गेल्या दीड तासापासून गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप हे पुढे जाण्यावर ठाम आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखून धरले आहे.
पोलिसांनी हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी काढण्यात येणारी बाईक रॅली रोखण्यासाठी आजपासून पुणे परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला होता. पोलिसांनी जागोजागी बॅरिकेडस लावून रस्ते बंद केले आहेत. या हिंदू जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने तरुण आणि इतर लोक सहभागी झाले होते. पुरंदर तालुक्यातील येथे भिवरी गावातील बापदेव घाट परिसरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोंढव्यातील संबंधितांवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी, तसेच भिवरी ग्रामस्थांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागण्यांसाठी सासवड ते कोंढवा हिंदू जनआक्रोश मोर्चा व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यातील जमीन खरेदी प्रकरणावरही आंदोलनाची भूमिका मांडली जाणार आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप मोर्चात सहभागी झाले आहेत. शिवतीर्थ सासवड ते खडीमशीन चौक, कोंढवा असा मोर्चाचा मार्ग असून मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गोपीचंद पडळकर हे खडी मशीन चौकात जाण्यासाठी अडून बसले आहेत. मात्र, पोलीस त्यांना सोडायला तयार नाहीत. बापदेव घाटात कोंढव्यातील काही लोकांना मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घ्यावेत आणि उलट कोंढव्यातील संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी हिंदू जनआक्रोश मोर्चाकडून करण्यात आली आहे. पुण्यात वाढत असलेल्या लव्ह जिहादच्या घटनांविरोधातही आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला आहे. त्यासाठी खडी मशीन चौकात गोपीचंद पडळकर यांची सभा होणार होती. मात्र, पोलिसांनी त्यांची बाईक रॅली रोखली. याविषयी गोपीचंद पडळकर यांनी नाराजी व्यक्त करत मला पुढे जाऊ द्या, अशी मागणी केली आहे. खडी मशीन चौक परिसरात काही मुस्लीम धर्मीयांनीही जमायला सरुवात केली आहे.
गोपीचंद पडळकर याठिकाणी गेल्यास कायदा-सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यादृष्टीने पुणे पोलिसांकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.