Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोर्टात जाताना वाटेत असलेल्या घरी जाताच आरोपी फरार; पोलीस अडचणीत

कोर्टात जाताना वाटेत असलेल्या घरी जाताच आरोपी फरार; पोलीस अडचणीत

मुंबई : खरा पंचनामा 

आर्थर रोड कारागृहातील कैद्याला सुनावणीसाठी न्यायालयात नेण्याऐवजी पश्चिम उपनगरातील त्याच्या घरी नेणे पोलिस शिपायाला चांगलेच महागात पडले. घरी जाताच संधी साधून आरोपीने धूम ठोकली. मुंबईत शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी पसार झालेला आरोपी आणि पोलिस शिपायाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

आरोपी आवेश अहमद एका गुन्ह्यात आर्थर रोड कारागृहात बंद होता. त्याची दिंडोशी येथील सत्र न्यायालयात सुनावणी होती. त्याची ने-आण करण्याची जबाबादारी सशस्त्र विभागात नियुक्त शिपाई गहिनीनाथ कांबळे यांच्यावर होती. कांबळे यांनी आवेशला पोलिस वाहनातून दिंडोशी न्यायालयात आणले. मात्र,

न्यायदालनात हजर करण्याऐवजी जोगेश्वरीतील निवासस्थानी नेले. आवेशने कुटुंबाची आणि वकिलांची भेट घेण्यासाठी कांबळे यांना प्रलोभन दाखवून फूस लावली होती. ठरलेल्या वेळेत न्यायालयात जाऊ आणि तेथून कारागृहात जाऊ, असे आश्वासन आवेशने दिले होते. मात्र, संधी साधून आवेश पसार झाला.

कांबळे यांनी संध्याकाळी चारच्या सुमारास वरिष्ठांना ही बाब कळवली. आरोपी पसार झाल्याचे समजताच वरिष्ठ पातळीवरून कांबळे यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. कायदेशीर रखवालीतून आरोपीस पळून जाण्यास सहकार्य केले, हा आरोप ठेवत त्यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी शिपाई कांबळे यांना नोटीस बजावून सोडण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.