बुकीजतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी आदरांजली
सांगली : खरा पंचनामा
सायंकाळचे आल्हाददायक वातावरण, समोर संथ वाहणारी कृष्णा नदी आणि मावळता सूर्य… अशा निसर्गरम्य वातावरणात 'सांगली बुकीज’तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एक अनोखा वाचन उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला वाचनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची प्रचंड आवड होती. जवळपास ५०००० हजार पुस्तकांसाठी घर बांधणाऱ्या या महामानवाला पुस्तक वाचन करून अभिवादन केले. त्यांच्या या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ‘बुकीज’ने हा उपक्रम आयोजित केला होता. कृष्णा नदीकाठी सुमारे २०० पुस्तकांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. विविध विषयांवरील ही पुस्तके पाहून वाचकांनी त्यातील आपल्या आवडीची पुस्तके निवडून तिथेच बसून वाचनाचा आनंद लुटला.
या उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. तसेच, तरुण पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही सांगण्यात आले. त्यासाठी शहरातील विविध भागात हा वाचन उपक्रम राबविण्यात येईल आणि यात सांगलीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात 'सांगली बुकीज’चे सुदर्शन चोरगे, सुहास गवळी, संभाजी दाणेकरी, सुजाता मराठे, रोहन आवळे, पूजा शहा, इंद्रायणी महाजन, ॲड. अक्षय राजगे, प्रतीक्षा कांबळे, बिना पाटील, सम्यक संबोधी, रेश्मा कदम, ॲड. असिफ मुजावर, अभिजीत पोरे, रक्षदा कदम, युवराज खरात, वैभव सूर्यवंशी, सचिन ठाणेकर आदींनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.