प्रफुल पटेल कुठे आहेत? पत्रकारांचा प्रश्न
सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती कधी येतात, कधी जातात !
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण सुत्रे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहेत. मात्र, सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्यात काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
त्यातच, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यातच, आज सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे दोन्ही वरिष्ठ नेते दिल्लीत त्यांच्यासमवेत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांनी कडक शब्दात उत्तर दिलं.
अजित पवारांच्या निधनानंतर एक महिन्याने म्हणजेच 28 फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडी दरम्यान पक्षाकडून निवडणूक आयोगाला जे मिनिट्स पाठवण्यात आले त्यात संविधानात बदल करण्यात आला असल्याचं निदर्शनास आलं आहे. सुनेत्रा पवार यांच नुकतच निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं होतं, त्यात पक्षाकडून करण्यात आलेला पत्र व्यवहार रद्द करण्यात यावा असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे, राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते आणि सुनेत्रा पवार यांच्या काहीतरी आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे दोघेही त्यांच्यासमवेत नसल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा होत आहे.
सुनेत्रा पवार दिल्लीत असताना पत्रकारांनी, प्रफुल पटेल आपल्या सोबत का नाही? असा प्रश्न सुनेत्रा पवार यांना विचारला. त्यावर, 'तुम्हालाच माहीत असेल ते केव्हा येतात आणि केव्हा जातात' असं उत्तर सुनेत्रा पवार यांनी दिलं. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या पूर्ण दिल्ली दौऱ्यात प्रफुल पटेल कुठेही दिसले नाहीत. त्यातच, त्यांच्या या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे हनुमान जयंतीच्या कार्यक्रमानिमित्ताने आपल्या रायगड जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. मात्र, प्रफुल पटेल दिल्लीत असूनही सुनेत्रा पवार यांच्यासमवेत नसल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.