Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालाची तारीख जाहीरमाजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आरोपी असल्याने राज्याचं लक्ष

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालाची तारीख जाहीर
माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आरोपी असल्याने राज्याचं लक्ष

धाराशिव : खरा पंचनामा 

कै पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या गाडीचा चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडात कोर्टाने निकालाची तारीख जाहीर केली असून १४ मे रोजी निकाल सुनावला जाणार आहे.

या हत्याकांडाला २० वर्ष पूर्ण झाली असून मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ जण यात आरोपी असून निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार असून त्याच्या जबाबाभोवती हे संपूर्ण प्रकरण फिरत आहे. २० एप्रिलच्या सुनावणीवेळी डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सात आरोपी हजर होते.

महाराष्ट्र पोलीस, सीआयडी आणि त्यानंतर सीबीआय अशा तीन तपास यंत्रणांनी याचा तपास केला असून सुनावणी दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह १२८ साक्षीदार तपासण्यात आले. १६ महिने कट रचून २५ लाखांची सुपारी देऊन दुहेरी हत्याकांड केल्याचा सीबीआयचा दावा आहे, यासाठी दोन शूटर आणि परदेशी शस्त्र यात वापरण्यात आले. ४ जुलै २०११ पासून गेली १४ वर्षे पासून सुनावणी सुरू आहे. डॉ. पाटील यांच्या वतीने 1 हजार 250 पानाचे लेखी म्हणणे मांडले आहे, ज्यात पवनराजे यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. खासदार पदावर असताना डॉ पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली होती.

पवनराजे यांची हत्या करण्यासाठी पारसमलने फेब्रुवारी २००५ मध्ये लातुर येथे जाऊन त्यांच्या घरी रेकी केली. त्यानंतर तो धाराशिवला आला, मात्र डाव फसल्याने तब्बल १६ महिने कट रचून, पाळत ठेवून ३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे हत्या करण्यात आली. हत्याकांडानंतर तीन वर्षांनी ६ जून २००९ रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली.

कै पवनराजे यांची हत्या ज्या शस्त्राने केली होती ती शस्त्र परदेशी बनावटीची होती. त्या बंदुकीवर मेड इन UAS चायना असे लिहले होते. पवनराजे यांची हत्या केल्यानंतर कोणताही पुरावा आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणून हल्लेखोर असलेल्या दोन शूटरनी समद काझी यांना सुद्धा एक गोळी मारली. गोळी आरपार गेल्याने दोघाचांही जागेवरच मृत्यू झाला. पवनराजे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी डोक्यात लागली तर काझी यांना एक गोळी झाडली.

राजकीय कारकीर्द आणि अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे आणि मोहन शुक्ला यांनी कट रचत २५ लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने दोषारोपपत्रात ठेवला आहे. माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे नऊ जण दुहेरी हत्याकांडात संशयित आरोपी आहेत.

एकामागून एक असे तीन खोटे गुन्हे नोंद होत असल्याने पारसमल जैन याने मुलगी वर्षा हिला सीबीआयला पत्र लिहून हत्याकांडाची माहिती दिली. त्यानुसार तिने २७ एप्रिल २००९ साली सीबीआयला पत्र दिले. डॉ पाटील यांच्या वतीने काही शब्द आणि आश्वासन देऊन वाऱ्यावर सोडले, शिवाय उलट खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने तो फुटला. आणि खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा केला. मुंबईचे तत्कालीन सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह त्यांच्या टीमवर गंभीर आरोप केले. अवैध कोठडीत ठेवणे, कबुली दिलेली असताना ती लपवून ठेवणे, खोट्या गुन्ह्यात अडकवणे यासह अन्य आरोप जैनने कोर्टात केले, त्यावर कोर्ट काय म्हणते याकडे लक्ष लागले आहे.

सीबीआयचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी ऋषीराज सिंग, पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर व त्यांच्या टीमची भूमिका महत्वाची राहिली. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने अॅड पी एम गवाड हे तर डॉ पाटील यांच्या वतीने अॅड भुषण महाडिक, अॅड रोहित मालपाणी हे तर इतरांच्या वतीने अॅड नेहा सुळे बाजू मांडत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.