Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निलंबित पोलिसाने बिल्डरला अडवून लुटले

निलंबित पोलिसाने बिल्डरला अडवून लुटले

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

अचानक ब्रेक मारल्याने मागून ठेकेदाराच्या वाहनाचा थार गाडीला धक्का लागला. त्यावरून दहशत माजवत एका निलंबित पोलिसाने बिल्डरला अडवून लूटमार केली. मी पीएसआय विष्णू पाटील आहे, अशी धमकी देत टोळक्याने बिल्डरची सोनसाखळी व मोबाईल हिसकावला, तसेच गाडीची तोडफोड करून जबरदस्तीने ४० हजार रुपये ऑनलाईन उकळले.

ही घटना रविवारी (दि.१९) रात्री सव्वानऊच्या सुमारास सेव्हनहिल रोड, आदिनाथ चौकात घडली. या प्रकरणी मुख्य आरोपी निलंबित पोलिस विष्णू सुरेश नानगुडे (२८) ऊर्फ विष्णू पाटील आणि त्याचा वाहन चालक रमेश काकासाहेब शिंदे या दोघांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मूळचे लातूर येथील मधुर मोहनराव चित्ते (३१, सध्या रा. प्राईड फिनीक्स, चिकलठाणा) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. रविवारी (दि. १९) चित्ते दाम्पत्य लातूर येथून शहरात परतले होते. रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास कारने गारखेडा येथील आदिनाथ चौकात समोरून जात असताना एका जीपने अचानक ब्रेक दाबल्याने चित्ते यांच्या कारचा थारला मागून धक्का लागला. त्यावेळी चित्ते यांनी त्यांना नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले व पत्नीला रुग्णालयात पोहोचवणे महत्त्वाचे असल्याने ते तिथून निघाले. मात्र काही अंतरावर सेव्हनहिल रोडने जाताना अॅक्सिस बँकेजवळ थारमधील आरोपींनी त्यांची गाडी पुन्हा अडवली, गाडीतून खाली उतरून त्यांनी शिवीगाळ करत गाडीच्या दरवाजावर लाथा मारल्या.

आरोपी विष्णू पाटील हा ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहे. सध्या तो निलंबित आहे. तो टीव्हीसेंटर भागात साई करियर नावाने अकादमीही चालवितो. सोशल मीडियावरही तो चांगलाच सक्रिय आहे. दरम्यान, चित्ते यांच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी कारवाई करत निलंबित विष्णू पाटील आणि रमेश शिंदे या दोघांना अटक केली.

मी विष्णू पाटील आहे, पीएसआय आहे, मला ओळखत नाही का? तुला शहराबाहेर जाऊ देणार नाही, अशी धमकी दिली. यावेळी दुसऱ्या एका साथीदाराने चित्ते यांचा मोबाईल हिसकावून घेतला. आरोपींनी गाडीच्या उजव्या बाजूची काच फोडली आणि दरवाजाचे हँडलही तोडून नुकसान केले. तुटलेली साखळी आणि मोबाईल परत हवा असल्यास ४० हजार रुपयांची मागणी केली. पत्नी सोबत असल्याने चित्ते प्रचंड घाबरले. आरोपी विष्णू पाटील याने रमेश शिंदेच्या गुगल पे वर ४० हजार रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. पैसे मिळाल्यानंतर यानंतर शहरात एकटे फिरू नका, तुम्हाला मारून टाकेन, अशी धमकी देऊन आरोपी पळून गेले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.