अजितदादांचा विमान अपघात : रोहित सिंगला अटक होणार?
जय पवार यांचे संकेत
बारामती : खरा पंचनामा
माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांचा विमान अपघात की घातपात यावरून अजूनही मोठा वाद आहे. आमदार रोहित पवार यांनी हा घातपात असल्याचा दावा केला आहे.
तर अजितदादांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनीही जाहीरपणे तीच भूमिका मांडली आहे. VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग आणि त्याचा मुलगा रोहित सिंग यांना अटक करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. यापूर्वी व्ही. के. सिंग यांची पुण्यातील सीआयडी कार्यालयात चौकशी करण्यात आली आहे. आज जय पवार यांनी याप्रकरणात मोठी अपडेट दिली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याचा मुलगा रोहित सिंग याला अटक व्हायलाच हवी अशी मागणी जय पवार यांनी केली आहे. आज बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना त्यांनी टीव्ही ९ मराठीला ही प्रतिक्रिया दिली. दादांच्या विमान अपघाताचा तपास CID कडे आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यात सर्व चित्र समोर येईल असे मोठे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात मोठी कारवाई होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी यापूर्वी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि त्यांचा मुलगा रोहित सिंग यांची सीआयडीकडून सखोल चौकशी करण्यात आली होती. 5 मार्च 2026 रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात दोघांची जवळपास 9 तास चौकशी करण्यात आली होती. पण या चौकशी दरम्यान या दोघांनाही व्हिआयपी ट्रिटमेंट देण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यांची मोठी बडदास्त ठेवण्यात आल्याचे तसेच त्यांनी क्रिकेटच्या सामन्याचाही आनंद लुटल्याचा आरोप पवार यांनी केला होती. तर जय पवार यांनी रोहित सिंग यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठीच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री आणि उमेदवार सुनेत्रा पवार यांनी जाहीर सभेत या अपघाताविषयी शंका उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याविषयीची मागणी केली आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष घातल्याचे भाष्य केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.