पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगलीचा स्वीकारला पदभार
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारला आहे. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
पोलीस अधीक्षक दोशी यांच्या इंट्रीमुळे आता सांगली जिल्ह्यात अवैध धंद्यांवर करडी नजर, गुन्हेगारांना इशारा तसेच जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेला नवी धार मिळेल अशी अपेक्षा सांगलीकरांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सांगली प्रशासनात कार्यक्षमतेचा नवा संदेश पसरला आहे.
“अवैध धंद्यांना थारा नाही आणि गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर दोशी यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत जिल्ह्यातील गुन्हेगारी स्थितीचा सखोल आढावा घेतला. अवैध वाळू उपसा, दारू विक्री, जुगार अड्डे आणि मटका यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच महिलांवरील अत्याचार, चोरी, दरोडे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून जलदगतीने तपास पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी पोलीस यंत्रणेला अधिक सजग, पारदर्शक आणि लोकाभिमुख बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांनीही कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा गुन्हेगारी बाब तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावी, असे आवाहन त्यांनी केले.
“पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढवूनच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल,” असेही त्यांनी नमूद केले. दोशी यांच्या कडक भूमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्येही नव्या पोलीस अधीक्षकांकडून कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या या नव्या धडाकेबाज सुरुवातीमुळे आगामी काळात जिल्हा अधिक सुरक्षित आणि गुन्हेमुक्त होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजेचे उपविभागीय अधिकारी प्रणिल गिलडा, सांगलीचे उपविभागीय अधिकारी संदीप भागवत, प्रभारी पोलीस उपाधीक्षक (गृह) गजानन सरगर, पोलीस निरीक्षक संजय मोरे, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, किरण रासकर, किरण चौगले, अरुण सुगावकर, सोमनाथ वाघ यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.