Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरण; प्रसिद्ध अभिनेत्रीला बेड्या ठोकल्यानं खळबळफरार सप्लायरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप

गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरण; प्रसिद्ध अभिनेत्रीला बेड्या ठोकल्यानं खळबळ
फरार सप्लायरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबईतील गोरेगाव उघडकीस आलेलं ड्रग्ज प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जातोय, तसतशी अत्यंत खळबळजनक माहिती समोर येत आहे.

नेस्को सेंटर इथल्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज ओवरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला. आता या प्रकरणात एका अभिनेत्रीलाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मीरा रोड येथील 33 वर्षांची अभिनेत्री जिया जेकब हिला अटक केली आहे. म्युझिक कॉन्सर्टशी संबंधित अंमली पदार्थांच्या एका कथित रॅकेटशी जोडलेले आर्थिक व्यवहार वळवण्यासाठी या अभिनेत्रीच्या बँक अकाउंट्सचा वापर करण्यात आला होता, असं तपासादरम्यान निष्पन्न झालंय.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली अभिनेत्री जिया जेकब आणि या प्रकरणात अटक करण्यात आलेले इतर आरोपी यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांतून पैशांच्या देवाणघेवाणीची एक स्पष्ट साखळी समोर आली आहे. विशेष म्हणजे, आरोपी आयुष साहित्य याच्यासोबतची चॅट हिस्ट्री देखील पोलिसांच्या हाती लागली आहे.

आरोपींनी जिया जेकबच्या अकाउंट्सवरुन व्यवहार केलेल्या रकमांचा तपशीलही समोर आले आहेत. आनंद पटेल यानं 64,000, विनीत गेरलानी यानं 22,500, शुभा अग्रवाल हिनं 1,66,400 आणि आयुष साहित्य यानं 1,84,600 इतकी रक्कम जमा केली होती. पोलिसांनी असा दावा केलाय की, हे सर्व ऑनलाइन व्यवहार संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित होते.

पोलीस तपासात समोर आलेल्या घटनांनुसार, जिया जेकब त्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये उपस्थित होती, जिथे ओव्हरडोसची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या दोन वर्षांपासून मुख्य फरार ड्रग्ज सप्लायरसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होती. असं सांगितलं जातंय की, ज्या फरार आरोपीच्या पोलीस शोधात आहेत, तो आरोपी परदेशात पळून गेलाय.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री जिया जेकब हिच्या बँक अकाउंट्समध्ये लाखो रुपयांचे मोठे ट्रान्झक्शन्स करण्यात आलेत. तसेच, अभिनेत्रीचा वैयक्तिक खर्च फरार सप्लायर उचलायचा. पोलिसांनी अशीही माहिती दिलीय की, अभिनेत्री जिया जेकब हिला आरोपीच्या बिजनेस ऑपरेशन्सबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नव्हती.

अटक करण्यात आलेला आरोपी आयुष साहित्य यानं पोलिसांना दिलेल्या जबाबाच्या आधारे, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी 933 गोळ्या (वजन अंदाजे 435 ग्रॅम आहे) जप्त केल्या असून, त्यांची बाजारपेठेतील अंदाजित किंमत 15.49 लाख रुपये इतकी आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेनं पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, साहित्य यानं हे अंमली पदार्थ पोलादपूरजवळ फेकून दिले होते. चेक पॉईंटवर करण्यात आलेल्या सुरुवातीच्या तपासणीत पोलिसांना काहीही आढळलं नसलं तरी, अटकेच्या भीतीपोटी आपण हे अंमली पदार्थ फेकून दिल्याची कबुली साहित्य यानं नंतर दिली. आरोपी आयुष साहित्यनं दिलेल्या जबाबाच्या आधारे, बुधवारी हे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. आयुष साहित्य तपासात पूर्णपणे सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी नमूद केलं असून, या अंमली पदार्थांचा मूळ स्रोत शोधण्यासाठी सध्या तपास सुरू आहे. मीरा-भाईंदर परिसरातून अभिनेत्री जिया जेकब हिला अटक करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.