अखिलेश यादव यांचा पुतळा जाळताना मोठा स्फोट; भाजपच्या महिला आमदार आगीत होरपळल्या
बहराइच : खरा पंचनामा
बहराइच येथे भाजपच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान धक्कादायक घटना घडली. आंदोलनादरम्यान पुतळा जाळताना अचानक स्फोट झाल्याने भाजप आमदार अनुपमा जयस्वाल या होरपळल्या. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी (डीएम) चौकात आंदोलन सुरू असताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येत होते. यावेळी अनुपमा जयस्वाल यांनी पुतळ्याला आग लावण्यासाठी काडी पेटवली असता, पुतळ्याच्या आत अचानक स्फोट झाला.
या स्फोटामुळे आगीचा भडका त्यांच्या चेहऱ्यावर आला. कपाळ आणि केसांना आग लागली होती. मात्र उपस्थित कार्यकर्त्यांनी तत्काळ आग विझवत त्यांना बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांच्या वाहनातून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल राय यांच्या मते, पुतळ्यात पेट्रोलचे प्रमाण अधिक असल्याने हा स्फोट झाला असावा. दरम्यान, महाराजा सुहेलदेव मेडिकल कॉलेज येथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांना सुमारे ४.५ टक्के 'सुपरफिशियल बर्न' झाली असून डोळ्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.