दादा खिंडकरला बाहेर काढायच असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिलेली तक्रार मागे घ्या...
बीड : खरा पंचनामा
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब खिंडकर 13 महिन्यांच्या कालावधीनंतर कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याने केलेल्या दाव्याने गेल्या 24 तासात मोठी खळबळ उडाली आहे.
जेलबाहेर येण्यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस मागे घेण्याची धमकी देण्यात आल्याचा खिंडकर याने केला होता. अखेर दादासाहेब खिंडकरांनी केलेल्या दाव्याला धनंजय देशमुखांनी देखील दुजोरा दिला असून चार महिन्यापूर्वीचं गुपीत त्यांनी फोडलं आहे.
भाजप आमदार सुरेश धस, धनंजय देशमुख आणि त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. मस्साजोग गावात होणाऱ्या चोऱ्या घरफोडी आणि विविध विषयांवर पोलीस अधीक्षक कार्यालयात तासभर पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना धनंजय देशमुखांनी चार महिन्यापूर्वी मला प्रस्ताव आल्याचे सांगत दादा खिंडकरच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.
धनंजय देशमुख म्हणाले, डिसेंबर महिन्यात ती घटना घडली होती. संतोष देशमुख प्रकरण मिटवण्यासाठी मला एका जागेवर बोलवून घेतले होते.. त्यातील एका साक्षीदाराने बोलावून घेऊन हे प्रकरण मिटवू असे म्हटलं होतं. मला ज्या ठिकाणी यायचे आहे त्या ठिकाणी मी येईल मात्र ज्या ठिकाणी तुम्ही बोलवाल त्या ठिकाणी येण्यास मी तयार नाही, त्यामुळे तिथे मी गेलो नाही. मी सहा महिन्यापूर्वी एसपींना देखील याविषयी सांगितले होते. माझी बदनामी, खच्चीकरण कसे होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र मी माझ्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहे आणि लढत राहीन.
धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब खिंडकर कारागृहातून 13 महिन्यानंतर बाहेर आल्यानंतर खिंडकरचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. दादासाहेब खिंडकर म्हणाला, आमच्यावर ज्यावेळी गुन्हा दाखल केला गेला त्यावेळी मला जेलमधून सोडण्यासाठी धनंजय देशमुखकडे प्रस्ताव देण्यात आला. दादा खिंडकरला बाहेर काढायच असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिलेली तक्रार मागे घ्या... आम्ही दादा खिंडकरला सोडवू असा प्रस्ताव दिला होता. या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं. या क्रूर हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यामुळे अखेर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.