"सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार... "
मुंबई : खरा पंचनामा
मागील काही दिवसांपासून महायुतीच्या तिन्ही पक्षात धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे. वरवर पाहता तिन्ही पक्षात सर्वकाही आलबेल असल्याचं बोललं जात आहे. विविध राजकीय नेत्यांची प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटासह अजित पवार गटाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्रात काहीतरी मोठं घडणार असल्याचं भाकीत रोहित पवार यांनी केलं आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण असंच बाहेर आलं नाही. ही फक्त सुरुवात आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे पक्की माहिती असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहून रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रोहित पवारांनी एक्स अकाऊंटवर लिहिलं की, "भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार- खासदार फोडणार असल्याच्या बातम्या आपण बघितल्या. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे."
"आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी 'ए दोस्ती हम नही छोडेंगे' ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत "जा बेवफा जा हमे..." याहून वेगळी असणार नाही, हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील", असं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी 'काम_कमी_कुरापती_जास्त' असा हॅशटॅग देखील वापरला आहे. रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर आता पुढच्या दीड महिन्यात नक्की काय घडणार? याबाबत तर्क वितर्क सुरू झाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.