मारहाण करून बुलेट चोरणाऱ्या टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या
सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पूजा फडके
सातारा : खरा पंचनामा
कोंडवे (ता. सातारा) परिसरात एका तरुणाला मारहाण करून त्याची बुलेट आणि इतर साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीचा सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन पुरुष आणि एका महिलेसह एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मेढा (ता. जावली) येथील रहिवासी शशिकांत रामचंद्र गोरे (वय ३१) हे १० एप्रिल २०२६ रोजी कोंडवे गावच्या हद्दीतील स्वामी विवेकानंद नगर येथून जात असताना ही घटना घडली होती. आरोपींनी गोरे यांना मारहाण करून त्यांची बुलेट दुचाकी, मोबाईल चार्जर आणि बॅग असा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी असा लावला छडा
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपास चक्राला गती दिली. तपासादरम्यान पोलीस अंमलदार संदिप पांडव यांनी घटनास्थळ आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कोंडवे परिसरातून दोन संशयित पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतले.
२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली बुलेट, मोबाईल चार्जर आणि बॅग असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर करत आहेत.
या पथकाने केली कारवाई
ही यशस्वी कारवाई सपोनि सुदर्शन काटकर, सपोनि अन्वर मुजावर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, मनोज गायकवाड, दादा स्वामी, संदिप पांडव, राजू शिखरे, विद्या कुंभार, तेजा तुपे आणि सचिन झनकर यांच्या पथकाने केली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.