अंजनगावात तणाव कायम, बाहेरच्यांना गावात प्रवेश बंदी, हाकेंचा ठिय्या
माढा : खरा पंचनामा
अंजनगाव खेलोबा येथील मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून बुधवारपासून सुरू असलेला वाद आज, शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही कायम आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाहेरील नागरिकांना गावात प्रवेश नाकारण्यात आला आहे. दुसरीकडे ओबीसी नेते, लक्ष्मण हाके हे गावात ठिय्या मांडून बसले आहे. तर, मराठा आणि धनगर बांधवांनी शांतता ठेवावी. बसून तोडगा नक्की काढू, असे आवाहन मराठा नेते, मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
अंजनगाव खेलोबा हे माढा तालुक्यातील तीर्थक्षेत्र असून जागृत देवस्थान आहे. लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी यात्रेला येतो. गावात ७० टक्के धनगर समाज आहे. खेलोबो देवस्थानच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर दोन गट आमने-सामने आले होते. पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला असता, काही तरुणांनी विरोध केला होता. दगडफेक आणि पोलिसांनी केलेल्या लाठी चार्ज यामध्ये पोलीस आणि आंदोलक जखमी झाले आहेत.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बुधवारी रात्री आणि गुरूवारी येथे भेट देऊन दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले होते. माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनीही भेट देऊन दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश मिळाले नाही सध्या या गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुरूवारी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे पोलीस बंदोबस्तात अंजनगाव खेलोबा येथे दाखल झाले. छत्रपतींच्या पुतळ्याप्रकरणी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यावर आरोप केले. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याआडून एखाद्या समाजात दहशत माजविण्याचा प्रयत्न होत आहे, त्याला माढ्याचे आमदार पाटील जबाबदार आहेत," असा आरोप हाकेंनी केला.
"ग्रामस्थ, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांरित करायचे ठरविले होते. पण, आमदार आभिजीत पाटील यांनी पुतळा स्थलांतरित होऊ दिला नाही," असा आरोपही हाकेंनी यावेळी केला.
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमचा कोणाचाही विरोध नाही. ज्यांनी हा पुतळा बसवला त्यांनी एक एकर जमीन द्यावी, आम्ही त्यावर शिवसृष्टी ऊभी करु असे सांगत रात्री अपरात्री चोरून पुतळा का उभारला जातोय. बसवायचाच आहे तर दिवसा वाजत गाजत बसवा," असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
"राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून असे पुतळे ऊभा करण्याचे प्रकार घडत आहेत. कधी वंजारी, कधी दलित तर आता धनगर समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागचा समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागचा हेतू काय आहे, याची चौकशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी हाकेंनी केली आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही येथून हलणार नाही," असेही हाकेंनी सांगितलं आहे.
"मराठा किंवा धनगर समाजामध्ये वाद पेटू नये. शांततेच्या मार्गानं दोन्ही समाजानं तोडगा काढावा. दोन्ही समाजाला तोडण्याचा डाव असू शकतो, याकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कुठलातरी नेता भडक प्रतिक्रिया देत तेढ निर्माण करेल. हा नेता नेहमीच इकडे तिकडे पळत असतो," अशी टीका जरांगेंनी हाकेंवर केली आहे. तसेच, "मराठा आणि धनगर बांधवांनी शांतता ठेवावी. बसून तोडगा नक्की काढू," असे आवाहनही जरांगेंनी केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.