Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"डॉ. आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हाच आमचा आत्मा"

"डॉ. आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हाच आमचा आत्मा"

मुंबई : खरा पंचनामा 

भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात राज्यातील प्रमुख नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी देशाला दिलेले संविधान हे भारताच्या प्रगतीचे मुख्य कारण आहे.

बाबासाहेबांनी समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी मोठे योगदान दिले आणि सर्वांना समान अधिकार मिळवून दिले. त्यामुळे आज भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे त्यांनी नमूद केले.

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, बाबासाहेबांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देताना रिझर्व्ह बँकेची संकल्पना मांडली होती. भारतात सेंट्रल बँक असावी, अशी कल्पना त्यांनी मांडली होती आणि त्यातूनच पुढे रिझर्व्ह बँक अस्तित्वात आली. तसेच चलन व्यवस्थेत सुधारणा करण्याचेही त्यांचे विचार महत्त्वाचे होते. जगभरात जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, त्यात बाबासाहेबांच्या जयंतीला विशेष स्थान आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, बाबासाहेब हे केवळ संविधान निर्माते नव्हते, तर ते माणुसकीचेही प्रतीक होते. त्यांनी आपले ज्ञान समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी वापरले. चवदार तळ्याच्या आंदोलनातून सामाजिक क्रांती घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

शिंदे यांनी पुढे म्हटले की, आज सामान्य माणूस देशातील उच्च पदांवर पोहोचू शकतो, हे संविधानामुळेच शक्य झाले आहे. त्यांनी स्वतः शेतकरी कुटुंबातून येऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली, हे बाबासाहेबांच्या विचारांचेच फलित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशातील आदिवासी महिला राष्ट्रपती होणे, हेही संविधानाचीच देण असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात बाबासाहेबांच्या कार्याची आठवण करून देताना त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.