त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शनाचा मोठा घोटाळा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला अटक
नाशिक : खरा पंचनामा
बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन करून देण्याच्या नावाखाली श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या एका विश्वस्तानेच काळा बाजार मांडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. १० मिनिटांत दर्शन करून देण्याच्या नावाखाली अलीकडेच दोन भाविकांची लुबाडणूक झाल्याचे समोर आले होते. तपासात देवस्थानच्या विश्वस्ताचा सहभाग उघड झाला. दोन पुतण्यांच्या माध्यमातून तो हा उद्योग करीत होता. पुतण्यासोबत कुणीही आले तरी त्यांना मंदिरात थेट प्रवेश होता. यातून व्हीआयची दर्शनाचा काळाबाजार मांडला गेल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी देवस्थानचे विश्वस्त पुरूषोत्तम कडलग याला अटक केली. पुरुषोत्तम कडलग हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा राज्य कार्याध्यक्ष असून पक्षाच्या कार्यक्रमांत पक्ष प्रमुख शरद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्यासोबतची छायाचित्र त्याने समाजमाध्यमात स्वतः ठेवलेली आहेत. त्र्यंबकेश्वर नगरीत देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शन व पूजाविधीसाठी येतात. सलग सुट्ट्या आल्यावर मोठी गर्दी होते. दर्शनासाठी रांगा लागतात. त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्यांना वाहन प्रवेश शुल्क, वाहनतळ, दर्शन, प्रसाधनगृह आदी व्यवस्थेत आर्थिक पिळवणुकीला तोंड द्यावे लागत असल्याची बाब मध्यंतरी गुजरातमधील भाविकाने जिल्हा प्रशासनासमोर मांडली होती. संबंधित भाविक दर्शन न घेता निघून गेला. मंदिर उघडण्याची व बंद होण्याची विशिष्ट वेळ असल्याने पाच ते सहा तास उभे राहूनही दर्शन मिळेल, याची शाश्वती नसते. या स्थितीचा काहींनी गैरफायदा घेतला. अवघ्या काही मिनिटांत दर्शन करून देण्याच्या नावाखाली व्हीआयपी दर्शनाचा काळाबाजार जोमात सुरू असल्याचे पोलीस कारवाईतून समोर आले आहे.
१० मिनिटांत दर्शन करून देण्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक झाल्या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गोटीराम पेहरे (४१, खडकवाडी, त्र्यंबकेश्वर) आणि अभिषेक कडलग (त्र्यंबकेश्वर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पेहरेला पोलिसांनी अटक केली असून अभिषेक कडलग फरार आहे. संशयित अभिषेक हा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरूषोत्तम कडलग यांचा पुतण्या आहे. संशयित पुतण्या अभिषेक आणि त्याचा भाऊ ओम कडलग यांच्यासोबत कुणीही आणि कितीही लोक असले तरी त्यांना मंदिरात दर्शनासाठी थेट प्रवेश जात होता. व्हीआयपी दर्शनाच्या काळ्या बाजारात विश्वस्त पुरूषोत्तम कडलगचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी दिली. व्हीआयपी दर्शन प्रकरणात देवस्थानच्या विश्वस्तांवर कारवाई झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.