'माझ्या खात्यासाठी महिला सचिव नको'
IAS मनीषा म्हैसकर यांचा महायुतीच्या मंत्र्याबाबत गौप्यस्फोट
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
"मला माझ्या खात्यासाठी महिला सचिव चालणार नाही," असे म्हणत एका मंत्र्यानं आपल्याला नाकारलं होतं, असा धक्कादायक दावा म्हैसकर यांनी केला आहे. या विधानामुळे मंत्रालयातील महिला-पुरुष भेदाचा आणि पुरुषी मानसिकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मनीषा म्हैसकर यांनी आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीतील हा कटू अनुभव दिल्लीतील महिला अधिकाऱ्यांच्या संमेलनानिमित्त प्रकाशित झालेल्या एका स्मरणिकेत मांडला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, २०२३ मध्ये राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा एका मंत्र्याने म्हैसकर यांना आपल्या विभागात घेण्यास स्पष्ट नकार दिला होता.
म्हैसकर यांनी लेखात नमूद केले की, त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळच्या सेवेत त्यांना अनेक आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मात्र, केवळ 'स्त्री' आहे म्हणून एखाद्या मंत्र्याने डावलल्याचा हा अनुभव त्यांना पहिल्यांदाच आला. विशेष म्हणजे, संबंधित मंत्र्याने म्हैसकर यांच्या कामाच्या क्षमतेवर शंका न घेता, केवळ महिला सचिव नको असल्याची भूमिका घेतली होती.
मनीषा म्हैसकर यांनी आपल्या लेखात कोणत्याही मंत्र्याचे नाव थेट घेतलेले नाही. मात्र, त्यांनी '२०२३ मधील सरकार' असा उल्लेख केल्यामुळे ही टीका थेट महायुती सरकारमधील एका वजनदार मंत्र्यावर असल्याचे बोलले जात आहे. या खुलाशानंतर मंत्रालयातील प्रशासकीय वर्तुळात आणि राजकीय गोटात तर्कवितर्क लढवले जात असून, तो 'स्त्री-विरोधी' मानसिकता असलेला मंत्री नेमका कोण? याची चर्चा रंगली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.