1 जूनपासून पुढील तीन महिने 22 टक्क्याहून अधिक देशांतर्गत विमानं रद्द
मुंबई : खरा पंचनामा
देशातील आघाडीच्या विमान कंपन्यांनी १ जूनपासून पुढील तीन महिन्यांसाठी देशांतर्गत विमान फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका-इराण युद्धाचा भडका उडाल्यानंतर विमान इंधनाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि शाळांच्या सुट्ट्या संपल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत होणारी हंगामी घट, ही या निर्णयामागील मुख्य कारणं असल्याची माहिती समोर आली आहे.
एअर इंडिया देशांतर्गत विमान फेऱ्यांमध्ये २२ टक्क्यांपर्यंत कपात करणार असल्याचे सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या या तोट्यात चालणाऱ्या विमान कंपनीने आपल्या आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्यांमध्येही सुमारे २७ टक्क्यांची कपात केली आहे, असंही सूत्रांचे म्हणणे आहे. एअर इंडिया दर आठवड्याला सुमारे ४,४०० विमान फेऱ्यांचे नियोजन करते. यापैकी साधारण ३,६०० देशांतर्गत (डोमेस्टिक) आणि ८०० आंतरराष्ट्रीय विमान सेवा आहेत.
तर इंग्रजी वृत्तपत्र द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार इंडिगोने आपल्या सेवांमध्ये ५ ते ७ टक्क्यांची कपात करण्याचे नियोजन केले आहे. विमान कंपनीच्या एकूण ऑपरेशनल कॉस्टमध्ये एकट्या विमान इंधनाचा वाटा जवळपास ४० टक्के असतो. एअर इंडियाने नुकतीच आपल्या आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्यांमध्येही कपात करण्याची घोषणा केली होती.
एअर इंडियाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आमच्या देशांतर्गत विमानांसाठी पूर्वी इंधनाचा खर्च प्रति किलोलीटर ८०,००० रुपये होता. राज्य सरकारांनी लावलेला व्हॅट वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळा असल्यामुळे, आता हा खर्च शहरांनुसार प्रति किलोलीटर १ लाख रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. इंधनाचे दर इतके जास्त असताना विमान फेऱ्या चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.
१७ मे रोजी दिल्ली सरकारने विमान इंधनावरील व्हॅट २५ टक्क्यांवरून कमी करून ७ टक्के करण्याची घोषणा केली होती. तसंच, 'आम्ही कोणत्याही मार्गावरील फेऱ्या पूर्णपणे बंद करणार नाही, परंतु काही विशिष्ट मार्गावरील विमानांच्या फेऱ्यांची संख्या कमी करू. आम्ही ज्या विमान सेवा कमी करणार आहोत, त्याची एक मोठी यादी तयार आहे अशीही सुत्रांची माहिती आहे.
:
कमी होण्याची शक्यता असलेल्या विमानांमध्ये मुंबई ते अहमदाबाद, नागपूर, पाटणा आणि भोपाळ दरम्यानच्या सेवांचा समावेश आहे. दिल्लीवरून हैदराबाद, बेंगळुरू आणि कोलकातासाठी जाणाऱ्या विमानांच्या फेऱ्याही कमी केल्या जातील, असे सूत्राने सांगितले. 'या कपातीचा मोठा भाग मुंबई आणि दिल्ली विमानतळांवरून करण्यात येईल. तर दक्षिणेकडील राज्यांनाही याचा फटका बसेल, कारण या मार्गावरील परतीची विमानेही रद्द केली जातील', असेही त्यांनी स्पष्ट केले.
विमान फेऱ्या कमी करण्याचे आणखी एक कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये झालेली घट होय. 'सध्या आंतरराष्ट्रीय नेटवर्क कमी झाल्यामुळे, दिल्ली आणि मुंबईसारख्या मुख्य केंद्रांवरून देशांतर्गत कनेक्टिंग विमाने घेणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही घट होण्याची शक्यता आहे. ग्राहकांकडून मागणी कमी असण्याचा अंदाज हे देखील यामागील एक कारण आहे', असे सूत्राने सांगितलं. त्याचबरोबर, आम्ही १ जूनपासून ऑगस्टच्या अखेरपर्यंत या विमानांचे संचलन करणार नाही. प्रवाशांनी बुकिंग करू नये म्हणून ही विमाने आधीच आमच्या वेबसाईटवरून हटवण्यात आली आहेत', असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दुसरीकडे, इंडिगोने सांगितलं की ते आपल्या देशांतर्गत सेवांमध्ये ५% ते ७% कपात करतील. शैक्षणिक सुट्ट्यांच्या कालावधीनंतरच्या महिन्यांत प्रवाशांची संख्या कमी असते. मागणीत होणाऱ्या संभाव्य घसरणीमुळे आम्ही १ जूनपासून विमानांच्या फेऱ्या कमी करत आहोत. इंडिगो दररोज १,९५० विमानांचे संचलन करतं, त्यामुळे अगदी छोटा टक्का कमी केला तरी रद्द होणाऱ्या विमानांची संख्या मोठी भरते', असं विमान कंपनीच्या सूत्राने सांगितलं. दिल्लीने ६ महिन्यांच्या कालावधीसाठी व्हॅट कमी केला असतानाच, महाराष्ट्र सरकारनेही गेल्या आठवड्यात विमान इंधनावरील व्हॅट १८ टक्क्यांवरून कमी करून ७ टक्के केला आहे. व्हॅटचे हे दर १४ नोव्हेंबरपर्यंत कायम असतील.
संकटात सापडलेल्या विमान वाहतूक उद्योगाला आधार देण्यासाठी केंद्र सरकारने १ एप्रिल २०२६ रोजी देशांतर्गत कंपन्यांसाठी विमान इंधनाच्या किमतींमधील वाढ २५ टक्क्यांवर कॅप केली आहे, जेणेकरून जागतिक अस्थिरतेचा फटका कमी बसेल. सरकारने विमानांचे पार्किंग शुल्कही कमी केले असून विमान कंपन्यांसाठी एक इमर्जन्सी क्रेडिट स्कीम देखील सुरू केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.