विषारी दारूमुळे 16 बळीनंतर पोलीस प्रशासनाला आली जाग
वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 9 पोलीस तडकाफडकी निलंबित
पुणे : खरा पंचनामा
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला कवेत घेणाऱ्या विषारी दारूच्या भीषण दुर्घटनेनंतर अखेर गृहविभाग आणि पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. अवैध दारू धंद्यांकडे डोळेझाक करणे आणि कर्तव्यात कमालीचा निष्काळजीपणा दाखवणे या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना अत्यंत महागात पडले आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तिघांना, तर दापोडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 6 कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दोन्ही पोलीस आयुक्तांनी जारी केले आहेत. या धडक कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
हडपसर परिसरात विषारी दारूमुळे चौघांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सोशल मीडियावर नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला होता. पोलिसांनीच अवैध धंद्यांना पाठीशी घातल्याचा थेट आरोप जनतेने केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी रात्री हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित करण्यात आले आहे.
फुगेवाडी (दापोडी) परिसरातील विषारी दारू कांडात तब्बल 12 लोकांचा मृत्यू झाल्याने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ आणि मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत अधिकारांचा वापर करत 6 जणांना तडकाफडकी निलंबित केले. विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत ही कारवाई लागू राहणार आहे. दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, गुन्हे शोध पथक प्रमुख राजू भास्कर, जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव, विशाल काळे सर्व पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे.
पांडुरंग सखाराम फुगे (५३), अकबर आजीमखान पठाण (४८), राजेश शांताराम राजपूत (५०), आनंद पांडेराव देसाई (५३), आनंद काशीनाथ निकाळजे (६४), कदीर अब्दुल शहा (४५), भिमाण्णा बसन्ना नागराल (२७), अक्षय अशोक अवसरमल (२८), सचिन रामचंद्र नेटके (३६), सुरप्पा मनाप्पा बंगारी (५५), राजेंद्र प्रकाश राठोड (३४) आणि विजय प्रकाश राठोड (३१). असे मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
या घटनेतील सर्वात सुन्न करणारी बाब म्हणजे, राजेंद्र प्रकाश राठोड (३४) आणि विजय प्रकाश राठोड (३१) हे दोन सख्खे भाऊ या विषारी दारूचे बळी ठरले. मुंबईवरून काही वर्षांपूर्वी कामानिमित्त हे राठोड कुटुंब फुगेवाडीत स्थायिक झाले होते. दोन्ही सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धक्कादायक म्हणजे, त्यांचे वडील प्रकाश राठोड यांनाही विषबाधा झाली असून, पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
5 जणांची प्रकृती अद्याप चिंताजनकः श्रीमंत शिवपुत्र कोळी (५२), प्रकाश उमाजी राठोड (६५), जितू मनोहर शेदातपुरी (३१), चंदन रामबल्ली कुमार (२६) आणि सुभाष डिग्गीकर (६६) यांच्यावर विविध रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.