Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"ही दुसरी कुणी व्यक्ती असती तर..." विनेश फोगाटप्रकरणी सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

"ही दुसरी कुणी व्यक्ती असती तर..." 
विनेश फोगाटप्रकरणी सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी 

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

सर्वोच्च न्यायालयाकडूनही भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला आशियाई क्रीडा स्पर्धा निवड चाचणीमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. याआधी उच्च न्यायालयाकडून विनेश फोगाटला आशियाई क्रीडा स्पर्धा निवड चाचणीत खेळण्याची परवानगी देण्यात आली होती; मात्र यानंतर भारतीय कुस्ती संघटनेने विनेश फोगाटप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत विनेश फोगाटचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाने विनेश फोगाटला आशियाई क्रीडा स्पर्धा निवड चाचणीत खेळण्याची परवानगी दिली असली तरी क्रीडा व्यवस्थापनात न्यायालयाचा वारंवार हस्तक्षेप होण्याबाबत त्यांच्याकडून चिंतादेखील व्यक्त करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, की 'ही दुसरी कुणी व्यक्ती असती तर परिस्थिती वेगळी असती; पण विनेश फोगाटने देशाचा अभिमान वाढवला आहे.

तसेच त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशावर नाराजी व्यक्त करत स्पष्ट सांगितले, की अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये न्यायालयांनी पटकन हस्तक्षेप केल्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या वेळापत्रकात अडचणी निर्माण होऊ शकतात. विनेश फोगाटने भारतीय कुस्ती संघटनेच्या निवड धोरणाला आव्हान दिले होते. या धोरणानुसार फक्त २०२५ आणि २०२६ मधील काही ठरावीक स्पर्धांमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंनाच निवड चाचणी स्पर्धेत भाग घेता येणार होता. विनेश फोगाटने उच्च न्यायालयाला सांगितले, की ती गर्भधारणेमुळे स्पर्धांपासून दूर होती. तिने जुलै २०२५ मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर पुन्हा सराव सुरू केला. त्यामुळे ती पात्रता मिळवण्यासाठी आवश्यक स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकली नव्हती.

देश सर्वप्रथम सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विनेश फोगाटला उद्देशून म्हटले, 'तुम्ही उत्कृष्ट खेळाडू आहात; पण देश सर्वप्रथम आहे.' सर्वोच्च न्यायालयाकडून या वेळी संघटना, नियम, इतर खेळाडूंना संधी याबाबतही संकेत देण्यात आले.

न्यायालयांचा हस्तक्षेप योग्य नाही न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांनी सांगितले, की 'हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासारखे प्रकरण नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये न्यायालयांचा असा हस्तक्षेप योग्य नाही.' दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विनेश फोगाटला तात्पुरता दिलासा देत भारतीय कुस्ती संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर तिचे उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ जून रोजी होणार आहे.

व्हिडिओ रेकॉर्डिंग अन् निरीक्षक दिल्ली उच्च न्यायालयाने २२ मे रोजी विनेश फोगाटला ३० आणि ३१ मे रोजी होणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली होती. उच्च न्यायालयाने चाचणी स्पर्धेतील लढतींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे तसेच साई आणि भारतीय ऑलिंपिक संघटना यांच्या स्वतंत्र निरीक्षकांच्या देखरेखीखाली प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.