Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चेन स्नॅचिंग करणाऱ्या मुंब्र्यातील अट्टल चोरट्याला अटक मोक्यात होता फरारी, 2.20 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

चेन स्नॅचिंग करणाऱ्या मुंब्र्यातील अट्टल चोरट्याला अटक 
मोक्यात होता फरारी, 2.20 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

मिरज तालुक्यातील अंकली येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम स्टाईलने पळालेल्या मुंब्रा येथील अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली. मोकामध्ये तो फरार होता. त्याच्याकडून चोरीचे दागिने दुचाकी असा 2.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

हैदरअली सरफराज कायम (वय २९, रा.इराणी इमाम बाडा, मुंब्रा, जि. ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 5 मे रोजी अंकली येथे ज्योती उपाध्ये या सकाळी सहाच्या सुमारास चालत निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून गेला होता. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोरट्याला पकडण्यासाठी निरीक्षक झाडे यांनी सहायक निरीक्षक लहू थाटे यांचे पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना पथकातील विक्रम खोत यांना एक रेकॉर्डवरील गुन्हेगार दागिने विक्री करण्यासाठी धामणी येथील पोलिटेक्निकजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून कायम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने अंकली येथील तसेच मुंबई येथे चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. तसेच तो मोकामध्येंही फरार असल्याचे स्पष्ट झाले. त्याला अटक करून दागिने, दुचाकी जप्त करण्यात आली. त्याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकात चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लहू थाटे, सागर लवटे, संदिप नलावडे, संदिप गुरव, उदयसिंह माळी, अमिरशा फकीर, सतिश माने, अमर नरळे, सागर टिंगरे, मच्छिद्र बर्डे, महादेव नागणे, विक्रम खोत, सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.