'डिजिटल 7/12'चे जनकच एसीबीच्या जाळ्यात!
नवी मुंबईचे अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
पुणे : खरा पंचनामा
राज्यातील महसूल विभागात डिजिटल क्रांती घडवून आणणाऱ्या आणि "डिजिटल 7/12 चे जनक" म्हणून ओळख निर्माण केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावरच लाचखोरीचा गंभीर आरोप झाल्याने राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई येथे अपर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले रामदास हरिभाऊ जगताप (मूळ गाव. जांबुत, ता. शिरूर, पुणे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तब्बल 22 हजार 500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. १३ मे २०२६ रोजी नवी मुंबईतील सिडको कार्यालयात ही धडक कारवाई करण्यात आली. एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्येही चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोच्या 22.5 टक्के योजनेतील जमिनीच्या करार प्रक्रियेसाठी संबंधितांकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. पडताळणीनंतर एसीबीच्या पथकाने कारवाई करत रामदास जगताप यांना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे, या व्यवहारात त्यांच्या सांगण्यावरून शिपाई हरेश सोनवणे याने लाचेची रक्कम स्वीकारल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे सोनवणे यालाही एसीबीने अटक केली आहे. रामदास जगताप यांनी महसूल विभागात डिजिटल 7/12 प्रणाली राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेमुळे त्यांची राज्यभरात वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे "डिजिटल 7/12 चे जनक" म्हणून त्यांचा उल्लेख केला जात होता. मात्र, जनतेसाठी पारदर्शक यंत्रणा उभी करणाऱ्या अधिकाऱ्यावरच आता भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रशासनात मोठी खळबळ एसीबीकडून केवळ लाच प्रकरणाचाच नव्हे तर संबंधित आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. पारदर्शक कारभाराचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.