मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला?
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचं मुख्य सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून तब्बल ८० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयात थेट मंत्र्यांच्याच दालनात चोरी झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या चोरीच्या घटनेनंतर आता मंत्रालयातील नियमांवरून एक नवीनच राजकीय आणि प्रशासकीय चर्चा रंगू लागली आहे. नियमांनुसार, मंत्रालयात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा कर्मचाऱ्याला आपल्यासोबत १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम आत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. मुख्य प्रवेशद्वारावरच तपासणी दरम्यान तशा सूचना दिल्या जातात. असे असताना मंत्री संजय राठोड यांच्या शासकीय कार्यालयात तब्बल ८० हजार रुपयांची एवढी मोठी रोकड आली कुठून? आणि ती तिथे का ठेवण्यात आली होती? याबाबत आता उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. ही रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच कार्यालयात एकच धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत कसून झाडाझडती घेण्यात आली.
मंत्रालयासारख्या व्हीआयपी (VIP) इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मोठे जाळे आणि चोख पोलीस बंदोबस्त असतानाही ही चोरी झाली आहे. मात्र, या चोरीच्या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. सध्या पोलिसांत अधिकृत गुन्हा दाखल न करता तपास सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.