टीसीएस धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानला लपवून ठेवणारा एमआयएमचा 'तो' नगरसेवक कोण?
नाशिक : खरा पंचनामा
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या 40 दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यासाठी एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईलही जप्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या 5 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होती. ती नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन घर (फ्लॅट) विकत घेतले होते. याच घरात निदा खानला ठेवण्यात आले होते.
निदा खान कौसर पार्क येथील मतीन पटेल यांच्या मालकीच्या घरात लपली असल्याची कुणकुण नाशिक पोलिसांना लागली. नाशिक पोलिसांनी तातडीने ही माहिती संभाजीनगर पोलिसांना कळवली. त्यानंतर नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने सलग दोन दिवस या इमारतीवर पाळत ठेवली. तांत्रिक तपासात खात्री पटताच मध्यरात्री छापा टाकून निदा खानला ताब्यात घेण्यात आले.
निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले होते, मात्र न्यायालयाने हे प्रकरण 'आंतरराष्ट्रीय सिंडिकेट' शी संबंधित असल्याचे सांगत तिचा जामीन फेटाळला. निदाच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, परकीय निधी आणि धर्मांतराचे जाळे यावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाशिकमधील TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांना पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिसांकडून दोघांची चौकशी सुरू असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही दोघांवर आहे. तसेच फिर्यादीला दिलेल्या गुंगीकारक पदार्थाचा स्रोत, बँक व्यवहार आणि फंडिंग याबाबतही पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.