Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्नाळमध्ये जेसीबीच्या साहाय्याने गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त!सांगली एलसीबीची कारवाई

कर्नाळमध्ये जेसीबीच्या साहाय्याने गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त!
सांगली एलसीबीची कारवाई 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवैध गावठी दारू निर्मिती करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील कर्नाळ गावच्या हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे ३१,६५० रुपये किमतीचे ७५० लिटर कच्चे रसायन आणि इतर साहित्य जागीच नष्ट केले आहे. ही संपूर्ण हातभट्टी जेसीबीच्या साहाय्याने उखडून टाकण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि त्यांचे पथक माधवनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना, विक्रम खोत यांना गोपनिय बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. कर्नाळ गावच्या हद्दीतील 'एस. सी. सीडस अँड फूडस फॅक्टरी'च्या उत्तरेला असलेल्या एका ओढ्यालगत जमिनीमध्ये लोखंडी बॅरल पुरून गावठी दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिमेंट फॅक्टरी जवळ गाड्या लावून ओढ्याच्या दिशेने पायी चालत जात छापा टाकला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच तिथे काम करणारे दोन इसम घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी केली असता, तिथे जमिनीत पुरलेली लोखंडी बॅरल्स, कच्चे रसायन आणि लाकडे पेटवल्याच्या खुणा आढळून आल्या.

सदर गावठी दारू मानवी आरोग्याला अत्यंत घातक आणि अपायकारक असल्याने, पोलिसांनी त्याचे नमुने (सॅम्पल्स) ताब्यात घेतले. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने जमिनीतून सर्व साहित्य बाहेर काढून खालील मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. यावेळी ७५० लिटर कच्चे रसायन, ०८ रिकामे लोखंडी बॅरल, १० लोखंडी डबे, ०१ लोखंडी कायल, ०२ पोती कोळसा असा ३१,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी नितेश कुंभार मारवाडी आणि संजय कुंभार मारवाडी (दोघे रा. कंझारभाट वस्ती, कर्नाळ, ता. मिरज) यांची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या हे दोघेही फरार (परागंदा) असून, त्यांच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, एलसीबीचे उपनिरीक्षक महादेव पोवार तसेच अतुल माने, महादेव नागणे, विक्रम खोत, अभिजीत माळकर, संकेत कानडे यांच्या पथकाने केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.