पाच हजारांची लाच घेताना पोलीस हवालदाराला अटक
सांगली एसीबीची भिलवडीत कारवाई : उपाधीक्षक इनामदार
सांगली : खरा पंचनामा
दाखल गुन्ह्यात पोलीस कोठडी न घेता न्यायालयीन कोठडी घेण्यासाठी भिलवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराला ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती सांगली एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली.
संतोष गोविंदराव बेंबडे (वय ४७, रा. नरगुळ वसती, कवठेमहांकाळ) असे अटक करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. तक्रारदाराविरोधात भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलीस कोठडी न घेता न्यायालयीन कोठडी मिळवून देणे तसेच तपासात मदत करण्यासाठी हवालदार बेंबडे यांनी सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १५ मे रोजी सांगली एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर बेंबडे यांनी तडजोडीअंती “आज ५ हजार रुपये द्या, उर्वरित दोन ते तीन हजार रुपये उद्या द्या,” असे सांगत एकूण ८ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच तत्काळ ५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यानंतर एसीबीने सापळा रचला. भिलवडी पोलीस ठाण्यासमोरील पोलीस रेस्ट रूमजवळील रस्त्याच्या कडेला तक्रारदाराकडून ५ हजार रुपये स्वीकारताना बेंबडे यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सांगली एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक शयास्मीन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, योगेश चव्हाण, प्रितम चौगुले, सुदर्शन पाटील, अजित पाटील, सागर नायकुडे, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, सिमा माने, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, राजेश मुदगल, महेश शेंडगे, विना जाधव, चालक विठ्ठलसिंग राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.