सांगलीतील विट्याच्या शौर्य आत्महत्या प्रकरणात पोलिसांचा निष्काळजीपणा?
दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
दिल्ली : खरा पंचनामा
दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकणाऱ्या १६ वर्षीय शौर्य पाटील या विद्यार्थ्याने १९ नोव्हेंबरला शिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. शोर्य पाटील हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांच्या खंडपीठासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. मृत विद्यार्थ्याचे वडील प्रदीप पाटील यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
याचिकाकर्ते प्रदीप पाटील यांच्या वतीने बाजू मांडताना वकील प्रीतिश सभरवाल यांनी न्यायालयात सांगितलं की, घटना घडून ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे, तरीही पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही ठोस किंवा अर्थपूर्ण चौकशी केलेली नाही.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाचं लक्ष एका गंभीर बाबीकडे वेधलं. मृत विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीचे मुख्य साक्षीदार हे त्याचेच वर्गमित्र (क्लासमेट्स) आहेत. हे सर्व साक्षीदार अल्पवयीन विद्यार्थी असल्याने, 'विटनेस प्रोटेक्शन स्कीम २०१८' (Witness Protection Scheme, 2018) अंतर्गत त्यांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी पोलिसांनी अद्याप आवश्यक पावले उचललेली नाहीत, असा गंभीर आरोप वकिलांनी केला.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने कोर्टात हजर असलेल्या तपास अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावर तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष तपास पथकाद्वारे केला जात आहे.
सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर, न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांनी थेट निर्देश दिले की, याचिकाकर्त्यांचे म्हणणे आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, 'डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, क्राईम-V' यांनी या प्रकरणाच्या सध्याच्या तपासाची स्थिती दर्शवणारा स्टेटस रिपोर्ट स्वतःच्या सहीनिशी न्यायालयात सादर करावा. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २४ जुलै २०२६ ला होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.