Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एपीआय वैशाली तोटेवार निलंबित होणार; पोलीस आयुक्तांकडून कार्यमुक्तीचा आदेश रद्द

एपीआय वैशाली तोटेवार निलंबित होणार; पोलीस आयुक्तांकडून कार्यमुक्तीचा आदेश रद्द

पुणे : खरा पंचनामा 

आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना तक्रारदाराची जमीन मिळवून देण्यासाठी 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली मुरलीधर तोटेवार (वय ४९) यांच्यावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. तोटेवार यांची पोलीस निरीक्षकपदी बढतीवर बदली झाली होती, मात्र तांत्रिक बाबी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी लाच घेतल्याने त्यांचा कार्यमुक्तीचा आदेश रद्द करून त्यांना निलंबित केले जाणार आहे.

तक्रारदार यांच्या अर्जावर वैशाली तोटेवार या तपास करत होत्या. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कारवाई करून तक्रारदाराची जमीन परत मिळवून देण्यासाठी त्यांनी एकूण 30 लाखांची मागणी केली होती. यातील 2 लाख रुपये त्यांनी आधीच स्वीकारले होते. उर्वरित 28 लाख रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले होते.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 2 मे रोजी बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉनराडच्या गेटसमोर सापळा रचला होता. तोटेवार यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्ती संभाजी शिवाजी चव्हाण (वय ४७, रा. सदाशिव पेठ) याने 28 लाख रुपये स्वीकारले. पैसे स्वीकारताच एसीबीने दोघांनाही ताब्यात घेतले.

वैशाली तोटेवार यांची लोहमार्ग, मुंबई येथे पोलीस निरीक्षकपदी बदली झाली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांना कार्यमुक्त करण्याचा आदेशही काढला होता. मात्र, प्रलंबित प्रकरणे हस्तांतरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्याऐवजी तोटेवार यांनी लाचेचे व्यवहार केले. यामुळे संतापलेल्या पोलीस आयुक्तांनी आता तोटेवार यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसीबीने आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सर्च ऑपरेशन करून लाच संबंधित प्रकरणाची फाईल जप्त केली आहे. आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ६ मे पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. वैशाली तोटेवार या मूळच्या नागपूरच्या असून त्या सध्या स्वारगेट पोलीस लाईनमध्ये राहत होत्या. कार्यमुक्त करण्याचा मेमो खिशात असतानाही लाचेची भूक न शमलेल्या या महिला अधिकाऱ्याच्या कृत्यामुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.