कर्नाटकात हायव्होल्टेज ड्रामा !
सिद्धरामैयांच्या राजीनाम्याआधीच राज्यपालांची मुंबईत धाव
बेंगळुरू : खरा पंचनामा
कर्नाटकच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे आज सकाळपासूनच अत्यंत नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामैया आज आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मात्र, ते राजीनामा देण्यापूर्वीच राज्यपाल थावरचंद गेहलोत अचानक बेंगळुरूहून मुंबईसाठी रवाना झाल्यामुळे कर्नाटकात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता राजीनामा आज होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आज सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान 'कावेरी' येथे सर्व मंत्री आणि आमदारांची एक तातडीची 'ब्रेकफास्ट मीटिंग' बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वाच्या बैठकीनंतर सिद्धरामैया हे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह थेट राजभवनात जाऊन आपला राजीनामा सोपवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही (CMO) सिद्धरामैया आजच राजीनामा देणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची तयारी पूर्ण झाली असतानाच, राज्यपाल थावरचंद गेहलोत मात्र बेंगळुरूमध्ये उपलब्ध नाहीत. कौटुंबिक कारणांमुळे (फॅमिली इमर्जन्सी) राज्यपाल त्यांच्या मूळ गावी आणि तिथून आज सकाळीच मुंबईला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपालांच्या या अचानक दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा कोण स्वीकारणार? याबाबत काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संपूर्ण गोंधळावर कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ स्पष्टीकरण दिले आहे. राज्यपाल बेंगळुरूमध्ये उपस्थित नसले, तरीही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा ठरल्याप्रमाणे आजच दिला जाईल, अशी माहिती देण्यात आली. राज्यपाल प्रत्यक्ष उपलब्ध नसले तरी राजभवन कार्यालयाकडे हा राजीनामा सुपूर्द केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्याबाहेर असलेल्या राज्यपालांच्या भूमिकेकडे आणि कर्नाटकातील या नव्या सत्तासंघर्षाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.