पदोन्नतीने बदली होऊनही एक लाखाची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक
अहिल्यानगर : खरा पंचनामा
पदोन्नती मिळून बदली झाल्यानंतरही एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नाशिकमधून ताब्यात घेतले. उपनिरीक्षक गांगुर्डे हा अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याची पदोन्नतीने अहिल्यानगरमधून नाशिकला बदली झाली होती. त्यामुळे त्याला बदली ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आल्याने तो नाशिकला गेला होता.
तक्रारदाराचे मामा व इतर १५ आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात ११ मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे याच्याकडे होता. या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी आणि नातेवाईकांची नावे वगळण्यासाठी गांगुर्डे याने सुरुवातीला २ लाख रुपये लाचेची मागणी केली होती.
या विरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. विभागाच्या पथकाने पंचासमक्ष या तक्रारीची पडताळणी केली. शहरातील पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या संभाषणादरम्यान गांगुर्डे याने तडजोडीअंती एक लाख रुपये लाच घेण्याचे मान्य केले. लाचेची रक्कम पोलीस मुख्यालय परिसरात स्वीकारण्याचे निश्चित झाले होते. त्याने लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे उघड झाल्याने त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला नाशिकमधून ताब्यात घेऊन नगरला आणण्यात आले.
आठ दिवसांपूर्वीच उपनिरीक्षक गांगुर्डे याची सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली होती. त्याची बदली नाशिक येथे झाली. दरम्यान, पदोन्नतीनंतर त्याला कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. अहिल्या नगर शहरातील पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी त्याला पाठविण्यात आले होते. तेथे त्याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. त्यामुळे त्यांनी तक्रारदाराला मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बोलावून घेतली होते. हा प्रकार सुरू असतानाच दरम्यान, त्याला मंगळवारी तालुका पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करण्यात आले आणि काल, बुधवारी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजू आल्हाट, अंमलदार चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ यांच्या पथकने ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.