Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण, दीड वर्षांनंतर पोलिसावर कारवाईची कुऱ्हाड

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण, दीड वर्षांनंतर पोलिसावर कारवाईची कुऱ्हाड

मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तर, दुसरीकडे आता एका पोलिसाचं निलंबन करण्यात आले आहे. सिद्दिकी यांच्या हत्येवेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस हवालदार श्याम मगन सोनावणे याला अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. विभागीय चौकशीत सोनावणे दोषी आढळल्यानंतर पोलीस आयुक्तांनी ही कठोर कारवाई केली.

ऑक्टोबर २०२४ मध्ये वांद्रे येथे बाबा सिद्दिकी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवेळी श्याम सोनावणे हे सिद्दिकी यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्यावर हजर होते. मात्र, हल्ल्याच्या वेळी प्रतिकार करण्यात किंवा परिस्थिती हाताळण्यात त्यांनी कसुरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत सोनावणे यांना तातडीने निलंबित करण्यात आले होते. २ मे २०२६ रोजी त्यांना बडतर्फीची अधिकृत नोटीस बजावण्यात आली असून, त्यांची पोलीस कारकीर्द संपुष्टात आली आहे.

दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत, मुंबई पोलीस दलातील सहा कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास हजारे यांच्यासह रहिमान सय्यद, राजेंद्र दिवटे, उमेश बांगर, अल्तमेश शेख आणि विशाल पारे यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी नवघर, विक्रोळी, भांडुप आणि घाटकोपर सारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांशी संबंधित आहेत.

५ एप्रिल २०२६ रोजी मुलुंडच्या आनंदनगर टोलनाका चौकीवर कर्तव्यावर असताना या सर्वांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वरिष्ठांच्या आदेशानुसार झालेल्या चौकशीत ते दोषी आढळले. सध्या या सहा जणांची विभागीय चौकशी सुरू असून, त्यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावरही बडतर्फीची टांगती तलवार कायम आहे. मुंबई पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.