बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा?
दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासह ६ राज्यांना इशारा
मुंबई : खरा पंचनामा
देशातील अनेक भागांत हवामानात मोठे बदल दिसून येत असून, दक्षिण भारतात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही उष्णता, उकाडा आणि वादळी पावसाचा दुहेरी परिणाम जाणवत असून विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील सात दिवसांत तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कर्नाटकातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश, यानम आणि पुद्दुचेरी भागात पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
लक्षद्वीपमध्ये शनिवार आणि रविवारी वादळी हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याची स्थिती आहे. उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेसोबतच काही भागांत मेघगर्जना, विजा आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रात विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज (ता. ९) यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणात उष्णता आणि उकाड्यात वाढ झाली असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह कमाल तापमानात चढ-उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, शुक्रवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राजस्थानातील फालोदी येथे देशातील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा ते कोमोरीन भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.