पंजाबच्या कॅबिनेट मंत्र्यांना ईडीने ठोकल्या बेड्या, १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
अमृतसर : खरा पंचनामा
पंजाबच्या आप सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांना ईडीने बेड्या ठोकल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, बनावट जीएसटी खरेदी बिले आणि १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मनी लाँड्रिंगच्या कथित प्रकरणात ईडीने अरोरा यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या 'आप' पार्टीला हा मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी सात खासदारांनी आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पंजाबमध्ये ईडीकडून धाडसत्र सुरू आहे. या कारवाईमुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
ईडीने शनिवारी सुमारे सात तास पंजाबमध्ये अरोरा यांच्या घरी तपास केला. या छाप्यानंतर ईडीने अरोरा यांना मनी लाँड्रिंगच्या कथित प्रकरणात अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, अरोरा यांना चंदीगडमधील सरकारी निवासस्थानातून अटक करण्यात आली. त्यांच्या मुलालाही अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. ईडीने आज सकाळी चंदीगडसह अरोरा यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते.
छापा मारताना सुरक्षेसाठी ३ डझन सीआयए (CIA) आणि एसएफ (SF) जवान तैनात करण्यात आले होते. या छापेमारीवरून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. चंदीगड आणि दिल्ली-एनसीआरमधील संजीव अरोरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चार ठिकाणांवर ईडीने सकाळी ७ वाजता धाड टाकली होती. सात तास तपास केल्यानंतर संजीव अरोरा आणि त्यांच्या मुलाला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. संजीव अरोरा यांना अटक केल्यानंतर आप सरकारने भाजपवर निशाणा साधला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.