Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"कोम्बिंग ऑपरेशन"च्या नावाखाली पबमध्ये रंगेलपणापत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस हवालदार निलंबित

"कोम्बिंग ऑपरेशन"च्या नावाखाली पबमध्ये रंगेलपणा
पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस हवालदार निलंबित

पुणे : खरा पंचनामा 

"कोम्बिंग ऑपरेशनची ड्युटी आहे", "तपासासाठी बाहेर आहे", "ससूनमध्ये मयत लागले आहे" अशा सबबी सांगत पत्नीला फसवणाऱ्या पोलीस हवालदाराचा अखेर पर्दाफाश झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पबमध्ये एका महिलेसोबत मौजमजा करताना पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर संबंधित पोलीस हवालदाराविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.

हनुमंत गुलाब कांबळे (रा. पीर वस्ती, वडकी) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तो काळेपडळ पोलीस ठाण्यात कार्यरत होता. या प्रकरणी त्याच्या पत्नीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत कांबळे यांचा विवाह २ जानेवारी २००३ रोजी झाला असून त्यांना दोन मुले आहेत. सुरुवातीला कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थित सांभाळणारा कांबळे गेल्या दीड वर्षांपासून घरी उशिरा येऊ लागला होता. कामावरून उशीर का होतो, असे पत्नीने विचारल्यास तो "तपास आहे", "मयत लागले आहे", "मी ससूनमध्ये आहे" अशी कारणे सांगत होता. तसेच तो वारंवार बेडरूमला कडी लावून मोबाईलवर बोलत असल्याने पत्नीला संशय आला.

पत्नीने मोबाईल तपासला असता एका महिलेशी सतत चॅटिंग सुरू असल्याचे दिसून आले. त्याबाबत विचारणा केल्यावर "ती महिला पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी आली होती, तेव्हापासून ओळख झाली," असे सांगून त्याने पत्नीची समजूत काढली. असल्याचे सांगून घराबाहेर पडत प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवड येथील 'सी डॉक' पबमध्ये संबंधित महिलेसोबत दारू पार्टी केल्याचा आरोप आहे.

पत्नीने पबमध्ये जाऊन जाब विचारला असता, "मी पोलीस आहे, माझे काहीही होणार नाही. तू काही करू शकत नाहीस," अशी उद्धट भाषा वापरल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर "मी सुधारेल" अशी माफी मागून त्याने पत्नीची समजूत घातली होती. मात्र काही दिवसांनी रामटेकडी परिसरात त्याची कार संशयास्पद अवस्थेत दिसल्यानंतर पत्नीने पाठलाग केला असता तो संबंधित महिलेसोबत असल्याचे उघड झाले.

तक्रारीनुसार, कांबळे याने उंड्री परिसरात त्या महिलेसाठी स्वतंत्र फ्लॅट घेतला होता. पत्नीने एकदा त्या दोघांना एकत्रित आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर पत्नीचे गहाण ठेवलेले सोने सोडवून त्याने संबंधित महिलेला दुचाकी घेऊन दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

५ मे २०२६ रोजी रात्रपाळीनंतर कांबळे घरी न परतल्याने पत्नी संबंधित महिलेच्या घरी गेली असता दार उघडण्यात आले नाही. घरमालकाने "एक पोलीस गॅलरीतून उडी मारून पळून गेला," असे सांगितल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत जाब विचारल्यावर "मी तुला मारीन, मला तुझ्यासोबत राहायचे नाही, तुला घटस्फोट देईन," अशी धमकी दिल्याचा आरोप पत्नीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हनुमंत कांबळे याला निलंबित केले असून पुढील तपास सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.