Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

८० हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

८० हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

पुणे : खरा पंचनामा 

पुणे शहरात नव्याने स्थापन झालेल्या लोहगाव पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली.

एका अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि भविष्यातही संरक्षण देण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती.

मनोज मधुकर बस्टे (वय ३८, रा. धानोरी) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३९ वर्षीय व्यावसायिकाने 'एसीबी'कडे तक्रार नोंदवली होती. तक्रारदार यांचा जमिनीचा व्यवसाय असून, त्यांच्याविरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात एक अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात बस्टे याने सुरुवातीला ७० हजार रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदाराने या मागणीबाबत ३० एप्रिल रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. विभागाकडून करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, बस्टे याने स्वतःसाठी आणि आपल्या वरिष्ठांसाठी म्हणून लाचेची रक्कम ८० हजार रुपये केली. अखेर १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या सायंकाळी लोहगाव पोलीस ठाण्याच्या परिसरातच सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराकडून ८० हजार रुपये स्वीकारताना बस्टे याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे, लोहगाव पोलीस ठाणे नवीनच कार्यान्वित झाले असताना, तिथे अशा प्रकारचा भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.