सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विरोधात पोलिसात तक्रार
'भारत 'हिंदू राष्ट्र' संविधान विरोधी असल्याचा आरोप
नागपूर : खरा पंचनामा
आम्हाला हिंदू राष्ट्र घोषित करायला सांगतात. आम्ही म्हणतो की, हिंदुस्थान हिंदू राष्ट्रच आहे, ते घोषित करण्याची गरज नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात एका कार्यक्रमात केले होते.
यानंतर आता डॉ. मोहन भागवत यांच्या विरोधात नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
२९ एप्रिल रोजी एका वृत्तपत्रात 'भारत है हिंदुराष्ट्रच आहे. त्यामुळे भारताला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करण्याची गरज नाही" असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केल्याचे प्रकाशित झाले होते. त्याचा संदर्भ तक्रारीत देण्यात आला आहे. तक्रारदार जनार्दन मून यांच्या मते, हे वक्तव्य भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता, समानता, सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मता या मूलभूत तत्वांच्या विरोधात असून यामुळे समाजात धार्मिक ध्रुवीकरण व तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच भारतात वादाचे वातावरण निर्माण करून जनतेला संविधान मानू नये, असे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आवाहन करण्यात आल्याचा आरोप मून यांनी केला आहे.
तक्रारदार जनार्दन मून यांनी आपल्या निवेदनात भारतीय संविधानाची प्रस्तावना कलम १४, १५, २५ ते २८ तसेच कलम ५१ अ यांचा उल्लेख करत भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे अधोरेखित केले आहे. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी, भगत सिंग, सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, सुखदेव शिवराम राजगुरु, सावित्रीबाई फुले, ज्योतीराव फुले, शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार बी. आर. आंबेडकर यांसारख्या महापुरुषांनी सर्व धर्म, जाती व घटकांना समान अधिकार असलेला लोकशाही भारत घडविण्यासाठी संघर्ष केला होता. तक्रारदार मून यांच्या मते, भारताला एका विशिष्ट धर्माशी जोडण्याचा कोणताही प्रयत्न हा संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांशी विसंगत असून स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान, संविधानिक मूल्ये आणि लोकशाहीच्या मूलभूत आत्म्याला धक्का देणारा आहे. भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांचा देश असून संविधानाने दिलेली "धर्मनिरपेक्ष राष्ट्र" ही संकल्पना देशाच्या ऐक्याची आधारशिला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
सरसंघचालक म्हणाले की, राम मंदिरासाठी एवढी मोठी चळवळ झाली नसती, तर मंदिर बांधले गेले असते का? पण ज्यांना राम मंदिर बांधायचे होते, तेच सत्तेत नसते, तर राम मंदिर बांधले गेले असते का?, राम मंदिर बांधण्याचा निर्णय झाला होता, पण पायाभरणी करणारे लोकच नसते, तर ते कसे उभे राहिले असते? असेही भागवत म्हणाले. मंदिराच्या बांधकामात योगदान देणाऱ्या सर्वांप्रति आम्ही आमची कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी त्यांचे काम केले. आता आपल्यालाही आपले काम करायचे आहे. जेणेकरून जगात धर्माची स्थापना होऊ शकेल. आज जगाला ज्याची गरज आहे, ती केवळ भारताच्या माध्यमातूनच पूर्ण होईल. केवळ भारताची मुळेच आपला उत्कर्ष करतील. दुसरा कोणताही देश भारताला वाचवणार नाही. भारतच प्रगती करेल आणि संपूर्ण जगाला वाचवेल, असेही भागवत म्हणाले. यावेळी भैय्याजी जोशी यांचे भाषण झाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.